बॉलीवूडचे कलाकार हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे या कलाकारांची चर्चा होताना दिसते. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या ऑटोबायोग्राफीमध्ये ‘त्रिशूल’ चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर सलीम खान यांच्याशी झालेल्या वादाबद्दल आठवण लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सलीम-जावेदला नाही म्हणायची तुझी हिम्मत कशी झाली?”

ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या त्यांच्या जीवनचरित्रात लिहिले आहे, “मुंबईतील एका हॉटेलमध्ये मी स्नूकर खेळत होतो. त्यावेळी सलीम साहेब तिथे आले आणि मला म्हणाले, सलीम-जावेदला नाही म्हणायची तुझी हिम्मत कशी झाली? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की मला ही भूमिका आवडली नाही. त्यावर सलीम खान यांनी अमिताभ बच्चन यांना लॉन्च केल्याबद्दल बढाया मारल्या आणि राजेश खन्नाने त्यांना एकदा नकार दिला होता आणि अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांचे करिअर संपुष्टात आल्याचे सांगितले. प्रेक्षकांना अमिताभसारखा नायक चित्रपटात पाहिजे होता. सलीम साहेबांनी मला सांगितले, तुला माहीत आहे का? आजपर्यंत आम्हाला कोणीही नाही म्हणू शकले नाही. आम्ही तुझे करिअर संपवू शकतो.”

पुढे ते लिहितात, “जेव्हा मी सलीम खानला विचारले की त्यांच्या मनात काय आहे, त्यांनी म्हटले, ‘तुझ्यासोबत कोण काम करेल? तुला माहिती आहे का, आम्ही राजेश खन्नाला जंजीर चित्रपट ऑफर केला होता आणि त्याने आम्हाला नकार दिला. आम्ही त्याला काही केले नाही पण आम्ही त्याला पर्याय निर्माण केला. अमिताभ बच्चनला राजेश खन्नाचा पर्याय म्हणून उभे केले आणि राजेश खन्नाचे करिअर संपले. आम्ही तुझ्याबरोबरदेखील अगदी तसेच करू”, असे सलीम खान यांनी म्हटल्याची आठवण ऋषी कपूर यांनी त्यांच्या जीवनचरित्रात लिहिली आहे. हा वाद पुढे वाढवला नसल्याचे ऋषी कपूर यांनी लिहिले आहे.

हेही वाचा: “मी कायम स्वत:ला हिरो समजायचो, पण…”, अरबाज पटेलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “एकच गोष्ट चुकीची…”

दरम्यान, सलीम-जावेद या दोघांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांच्या कथा लिहिल्या. पण काही कारणाने नंतर ही जोडी वेगळी झाली. खूप वर्षांनी नुकतीच सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या आयुष्यावर आधारित अँग्री यंग मेन ही डॉक्युमेंटरी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी दोघांनी त्यांच्या कामाबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या.

ऋषी कपूर यांनी १९७३ मध्ये ‘बॉबी’ चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. याच वर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातून अँग्री यंग मॅन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. 

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor recalled the threat salim khan made to him when he refused to do the film trishul destroyed rajesh khanna career by creating amitabh bachchan will do the same with you nsp