अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख ही जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या कामाबरोबर असते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चांगलेच चर्चेत असतात. त्यांच्या मुलांवर देखील ते चांगले संस्कार करत आले आहेत आणि याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. त्यांची दोन्ही मुलांचं नेहमीच सर्वांकडून कौतुक होत असतं.
रितेश आणि जिनिलीया नुकतेच करीना कपूरच्या चॅट शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. तसंच मुलांना वाढवताना त्यांच्या बाबतीत त्या दोघांचे विचार काय असतात हेही त्यांनी शेअर केलं. याच दरम्यान त्यांच्या मुलांनी कधी अपशब्द वापरला तर रितेश आणि जिनिलीया कसे रिॲक्ट करतील हे त्यांनी सांगितलं आहे.
रितेश म्हणाला, “वाईट शब्द कोणते हे मुलांना माहीत असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा ते नवनवीन गोष्टी शिकत असतात. पण ते काय बोलतात याचं त्यांना भान असणं महत्वाचं आहे. त्या शब्दांचे अर्थ काय हे त्यांना त्यांच्या त्यांच्या वयानुसार सांगणं ही पालक म्हणून आमची जबाबदारी आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही या कुठल्याही गोष्टीबद्दल आमच्या पालकांशी कधीही चर्चा केली नाही. आमच्या वेळी आम्ही मित्र-मैत्रिणींकडून हे सगळं जाणून घ्यायचो. पण आता काळ बदलला आहे. काही गोष्टी तुम्ही मुलांपासून लपवू शकत नाही.”
तर जिनिलीया म्हणाली, “मुलांच्या जडणघडणीत आपला सहभाग असणं हे कोणत्याही पालकाला आवडतं. जर माझ्या मुलांनी मला काही चांगल्या आणि वाईट शब्दांचे अर्थ विचारले तर, त्या वाईट शब्दांचे अर्थ तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज नाही, असं मुलांना सांगण्याच्या ऐवजी या शब्दांचे अर्थ असे असे आहेत पण हे शब्द वापरणं चुकीचं आहे असं आम्ही त्यांना सांगतो.” रितेश आणि जिनिलीयाचं हे बोलणं सध्या खूप चर्चेत आलं आहे.