अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. त्या दोघांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांनी लग्नाचा १० वा वाढदिवस साजरा केला. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. नुकतंच त्या दोघांचा आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या त्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांचा आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. तब्बल १० वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करताना पाहता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर फारच मजेशीर आणि विनोदी असल्याचे पाहायला मिळत आहे. यात जिनिलिया आणि रितेश दोघंही गरोदर असल्याचं दाखवण्यात येत आहे.

या ट्रेलरची सुरुवात डॉक्टरांच्या चेकअपद्वारे होते. यात डॉक्टरांच्या भूमिकेत महेश मांजरेकर पाहायला मिळत आहे. यात रितेश हा गरोदर असल्याचे समजल्यानंतर काय गंमतीजंमती होतात, त्याचे वाढणारे पोट, मीडियाची प्रसिद्धी याचा त्यांना कसा त्रास होतो, या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला अनेकजण पसंती दर्शवताना दिसत आहेत.

रितेश देशमुखचा ‘मिस्टर मम्मी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून त्याची पत्नी जिनिलिया बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे ते दोघेही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. हा एक विनोदी आणि रोमँटिक चित्रपट असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करणार आहे. भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर हे कलाकार दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia mister mummy official trailer released nrp