Riteish Deshmukh : गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांप्रमाणे मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. अलीकडच्या काळात अनेक लोक पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यास प्राधान्य देतात. रितेशने सुद्धा आपली दोन्ही मुलं रियान-राहिल आणि पुतण्यांकडून इकोफ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती बनवून घेतली आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रितेश देशमुखची सध्या महाराष्ट्राचा लाडका दादा, भाऊ म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘तुझे मेरी कसम’ म्हणत रितेशने २००३ मध्ये त्याचा फिल्मी प्रवास सुरू केला. आजच्या घडीला अभिनेत्याचे संपूर्ण देशभरात लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलीयाने आपल्या दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत. पापाराझींना पाहून त्यांची मुलं नेहमी हात जोडून नमस्कार करत त्यांचा आदर करतात. मुलांचे संस्कार, मराठमोळी संस्कृती जपल्याने रितेश-जिनिलीयाचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : शिवरायांचा जयघोष करत संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री! आर्या लाजली, तर अरबाज-निक्की…; पाहा प्रोमो
रितेश देशमुखची खास पोस्ट
रितेशने गणपतीनिमित्त आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवला. घरी बाप्पाची मनोभावे पूजा तर केलीच…मात्र, अभिनेत्याने त्याच्या दोन्ही मुलांच्या मदतीने बाप्पाच्या काही इकोफ्रेंडली गणेशमूर्ती घडवल्या. स्वत:च्या हाताने मूर्ती घडवून रितेशच्या मुलांनी याला रंगकाम केलं. एवढंच नव्हे तर, त्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करून या मुलांनी घरातच बाप्पाचं पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केलं.
रितेश ( Riteish Deshmukh ) हा व्हिडीओ शेअर करत लिहितो, “गणपती बाप्पा मोरया! इकोफ्रेंडली पद्धतीने बाप्पाची मूर्ती बनवणं ही देशमुखांच्या घरची परंपरा आहे. या बाप्पाचं आम्ही घरातच विसर्जन केलं. आमच्या मुलांनी स्वत: बाप्पाच्या मूर्ती साकारल्या…प्रत्येक बाप्पा किती सुंदर बनवला होता…खरंच बाप्पा किती गोड दिसतो”
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेषत: मुलांना दिलेले संस्कार पाहून नेटकऱ्यांनी रितेश-जिनिलीयाचं ( Riteish Deshmukh ) विशेष कौतुक केलं आहे. अवघ्या तासाभरात या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – ‘बिग बॉस’मध्ये यंदाची पहिली Wild Card एन्ट्री! घरात आला संग्राम चौगुले; कोण आहे तो? वाचा…
रितेश देशमुखची सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सर्वत्र चर्चा होत आहे. यंदा पहिल्यांदाच अभिनेत्याने या कार्यक्रमाची होस्टिंगची जबाबदारी सांभाळली आहे आणि या सीझनला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे.