Riteish & Genelia Deshmukh : रितेश देशमुख व त्याच्या कुटुंबाकडे ‘आदर्श कुटुंब’ म्हणून पाहिलं जातं. रितेश व त्याची पत्नी जिनिलीयाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या जोडप्याने मराठीसह हिंदी कलाविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रितेश-जिनिलीयाची मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ सिनेमा २०२२ च्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. यामधील सगळीच गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
रितेश देशमुखचा ‘वेड’ सिनेमा महाराष्ट्रात ब्लॉकबस्टर ठरला होता. हा जिनिलीयाचा पहिला मराठी चित्रपट होता. या सिनेमाच्या हटके लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ७५ कोटींहून अधिक कमाई केली होती.
‘वेड’ सिनेमातलं ‘मला वेड लावलंय!’ गाणं सलमान खान आणि रितेश देशमुख यांच्यावर चित्रित झालं आहे. हे गाणं सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच सर्वत्र चर्चेत आलं होतं. आता चित्रपट प्रदर्शित होऊन २ वर्षे उलटली असली तरी, आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. या गाण्यावर स्वत: रितेश देशमुखने ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘मला वेड लावलंय!’ या गाण्यावर रितेश आपल्या दोन्ही मुलांसह जबरदस्त डान्स करताना दिसला. त्याची दोन्ही मुलं रियान आणि राहील आपल्या बाबाला पाहून ‘मला वेड लावलंय!’ गाण्याची हूकस्टेप करत होते. हा गोड फॅमिली व्हिडीओ ‘madoholic‘ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
रितेश व दोन्ही मुलं डान्स करत असताना जिनिलीया सुद्धा उपस्थित होती. तिने गोलकार फिरून हा सुंदर क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. जिनिलीया नवरा आणि मुलांचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ काढताना दिसली. रितेश-जिनिलीयाच्या या सुंदर बॉण्डिंगचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेता ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश स्वत: करतोय आणि या चित्रपटाची निर्मिती जिनिलीया देशमुख करणार आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय, रितेशचे ‘रेड २’, ‘हाऊसफुल ५’ हे सिनेमे सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.