Riteish Deshmukh Demands Justice : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. शनिवारी रात्री ( १२ ऑक्टोबर ) तीन अज्ञातांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दुर्गा पूजेदरम्यान सर्वत्र फटाके वाजत असताना संधी साधून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर बाबा सिद्दीकींना गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, त्याआधीच त्यांनी प्राण गमावले होते. या घटनेची माहिती कळताच सलमान खानने ‘बिग बॉस’चं शूटिंग त्वरीत रद्द करून तो लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला.

संजय दत्त, सलमान खान, शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा, सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल, झहीरचे वडील इक्बाल रतनसी, वीर पहारिया असे सगळे सेलिब्रिटी शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. याठिकाणी बाबा सिद्दीकींच्या कुटुंबीयांची सगळ्यांनी भेट घेतली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला असून राजकीय क्षेत्रापासून ते कलाविश्वापर्यंत सर्व स्तरांतून बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : Salman Khan on Baba Siddique: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”

रितेश देशमुखची पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) सुद्धा बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला उपस्थित असायचा. त्यांच्या हत्येनंतर अभिनेत्याने एक्स पोस्ट शेअर करत न्यायाची मागणी केली आहे. रितेश लिहितो, “बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल समजल्यावर प्रचंड दु:ख झालं. या घटनेबद्दल ऐकल्यावर मला धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर माझ्या संवेदना आहेत. या कठीण प्रसंगाचा सामना करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होऊन याप्रकरणी न्याय मिळाला पाहिजे… गुन्हेगारांना अद्दल घडलीच पाहिजे.”

हेही वाचा : Video : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवूडवर शोककळा! शिल्पा शेट्टी भावुक; संजय दत्तसह अनेक सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचले

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांआधीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर त्यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. शनिवारी रात्री वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नल परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.