Riteish Deshmukh Expresses Anger Over Pahalgam Attack: काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी पहलगाम हल्ल्यानंतर हळहळ व्यक्त केली. सोशल मीडिया अकाउंट, तसेच विविध मुलाखतींमधून हे कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत. संजय दत्त, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय कुमार, जान्हवी कपूर, तसेच इतर कलाकारांनी या हल्ल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
रितेश देशमुख काय म्हणाला?
आता अभिनेता रितेश देशमुखदेखील पहलगाम हल्ल्यावर व्यक्त झाला आहे. अभिनेत्याने नुकतीच ‘फिल्मीज्ञान’ या चॅनेलशी संवाद साधला. यावेळी रितेश देशमुख म्हणाला, “हे खूप दु:खद आहे. देशभरातून लोक पहलगाममध्ये सुट्यांसाठी जातात. अचानक दहशतवादी गोळीबार करतात. हे फक्त त्या कुटुंबांचेच नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान आहे. कोणताही दहशतवादी हल्ला आपल्या समाजाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो.”
रितेश देशमुख पुढे म्हणाला, “नरेंद्र मोदी यांचे सरकार याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलत आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. कोणताही शेजारी देश आपण आपल्या देशात कसे राहायचे हे सांगू शकत नाही. हुकूम देऊ शकत नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना सांगितले पाहिजे की, काश्मीर भारताचा भाग आहे.”
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जे पर्यटक मुस्लिम नाहीत, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये देशातल्या विविध राज्यांतील २६ पर्यटकांनी जीव गमावला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने काही निर्णायक पावले उचलली आहेत.
अभिनेता संजय दत्तने या दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करीत लिहिले होते, “त्यांनी आपल्या लोकांना निर्दयीपणे मारले. हे माफ केले जाऊ शकत नाही. आपण शांत बसणार नाही हे या दहशतवाद्यांना माहीत असण्याची गरज आहे. याचा बदला घेण्याची गरज आहे.” विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या दहशतवादी हल्ल्याबाबत लिहिले होते, “पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला; त्यामध्ये ज्या कुटुंबांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले, त्यांच्या दु:खाची कल्पनाही करू शकत नाही. त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना”, अशा शब्दांत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो लवकरच ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुख समोरासमोर दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १ मे २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच सध्या रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्येदेखील व्यग्र आहे.