अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही ते कायमच चर्चेत असतात. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ते विवाहबंधनात अडकले. रितेश आणि जिनिलीया यांना दोन मुलं आहेत. मात्र आता त्या दोघांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे जिनिलीया पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमाला जिनिलीया आणि रितेश देशमुख या दोघांनी हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ विरल भय्यानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जिनिलीया हातात हात घालून कार्यक्रमासाठी पोहोचल्याचे दिसत आहे. यावेळी जिनिलीयाने जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. तर रितेशने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली होती.या व्हिडीओत तिच्या बेबी बंपने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत ती गरोदर असल्याचा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. जिनिलीया पुन्हा गरोदर आहे, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने पुन्हा गरोदर अशी कमेंट केली आहे. ही तिसऱ्यांदा गरोदर आहे, असे एकाने म्हटले आहे. मला वाटतंय की ती गरोदर आहे, अशी कमेंट काहींनी केली आहे.
दरम्यान बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले.
मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला, मात्र जिनिलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. त्या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.