Riteish Deshmukh on Corruption: अभिनेता रितेश देशमुख लवकरच ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता नुकतीच रितेश देशमुखने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने भ्रष्टाचारावर वक्तव्य केले.

रितेश देशमुख भ्रष्टाचाराबाबत काय म्हणाला?

रितेश देशमुख आणि ‘रेड २’चे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ‘फिल्मीज्ञान’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचार होताना पाहिला आहे का? किंवा एखाद्या व्यक्तीने त्यांच्याबरोबर भ्रष्टाचार झाल्याचे तुम्हाला सांगितले आहे का? त्यावर रितेश देशमुखने मी कधीच भ्रष्टाचाराचा सामना केला नाही, असे उत्तर दिले.

पुढे अभिनेता असे म्हणाला की, भ्रष्टाचार कुठून सुरू होतो. जेव्हा पालक त्यांच्या मुलाला सांगतात की बाळा, तू जर परीक्षेत चांगले मार्क्स मिळवलेस, तर मी तुला बॅट घेऊन देईन. तू अमुक एखादी गोष्ट म्हणालास, तर मी तुला चार चॉकलेट देईन. त्यामुळे आपण जरी भ्रष्टाचार करीत नसलो तरी आपण त्याच्या मुळापर्यंत गेलो, तर त्याची सुरुवात येथून होत असते. कमीशन,

पुढे रितेश देशमुख उदाहरण देत म्हणाला की, जर तुम्ही माझ्यासाठी एखादी गोष्ट केली, तर मी तुमच्यासाठी एखादी गोष्ट करेन, अशी जी देवाण-घेवाण आहे. ती देवाण-घेवाण जर मोठ्या स्तरावर घेऊन गेलो, तर ती भ्रष्टाचाराच्या रूपात मोठ्या प्रमाणात पसरते.

राज कुमार गुप्ता म्हणाले की, आपण समाजात राहतो. आपण गोष्टी बघत असतो, त्याबद्दल वाचत असतो. त्यामुळे समाजात भ्रष्टाचार होत असल्याची जाणीव असते.

याच मुलाखतीत तुमच्या मते भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सर्वांत मोठी शक्ती कोणती? असे विचारण्यात आले. त्यावर अभिनेता म्हणाला की नाही म्हणा. राज कुमार गुप्ता म्हणाले की, नाही म्हणा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा.

रेड २ या चित्रपटाविषयी बोलताना राज कुमार गुप्ता म्हणाले की रेड २ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’चा पुढचा भाग आहे. या चित्रपटात अजय देवगण व रितेश देशमुख हे समोरासमोर दिसणार आहेत. तर रितेश देशमुखने या चित्रपटाच्या कथेचे कौतुक केले. जेव्हा मला चित्रपटाची गोष्ट सांगण्यात आली तेव्हा मला माहीत नव्हते की, माझ्याकडून काय अपेक्षा आहेत. पण, खूप वर्षांनंतर प्रतिस्पर्ध्याची भूमिका करायला मिळणार होती आणि त्यामुळे माझ्या मनात उत्सुकता होती.

अजय देवगण व रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला रेड २ हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, अभिनेता हिंदी व मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. लय भारी, वेड हे त्याचे मराठी चित्रपट चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले. त्याबरोबरच अभिनेता बिग बॉस मराठी ५ चे सूत्रसंचालन करतानादेखील दिसला. अभिनयाबरोबरच अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. रितेश व जिनिलिया यांच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.