Riteish Deshmukh Pay Last Respect To Ratan Tata : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बुधवारी ( ९ ऑक्टोबर ) रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामान्य लोकांपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत सर्वांनीच रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता रितेश देशमुखने भावुक पोस्ट शेअर करत रतन टाटांबरोबरची पहिली भेट व त्यादरम्यान आलेला अनुभव याचा जुना किस्सा सांगितला आहे.

रितेश देशमुखची रतन टाटांसाठी भावुक पोस्ट; सांगितला २०१२ मध्ये घडलेला किस्सा

आज मागे वळून पाहताना…

२०१२ मध्ये घडलेला हा एक किस्सा जो माझ्या कायम स्मरणात राहणार…

जिनिलीया आणि मी २०१२ ला रोम हे शहर फिरण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी आम्ही दोघं सकाळी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये बसलो होतो आणि आमच्या दोघांच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडली जी आम्ही कधीच विसरणार नाही.

जिनिलीयाने हळूच मला धक्का दिला आणि आमची नजर पलीकडच्या एका ओळखीच्या व्यक्तीवर गेली… ते होते रतन टाटा! माझ्या वडिलांची आणि त्यांची आधीपासून मैत्री होती. पण, यापूर्वी माझी त्यांच्याशी कधीच भेट झालेली नव्हती. त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करण्यासाठी मी संपूर्ण धैर्य एकटवलं पण, मी त्यांना अभिवादन करण्याआधीच ते म्हणाले ‘हॅलो रितेश’. खूप प्रेमाने स्मितहास्य करून त्यांनी माझं स्वागत केलं.

कामानिमित्त बाहेरगावी असल्याने ते आमच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. लग्नाला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांनी मागितलेली माफी माझ्या मनाला भिडली. त्यांच्या चेहऱ्यावर दयाळू, विचारशील असा भाव होता जो मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्याबरोबर जिनिलीया असल्याचा उल्लेख मी त्यांच्याशी गप्पा मारताना केला होता. त्यामुळे जिनिलीया कुठे आहे याबद्दल त्यांनी स्वत: चौकशी केली. मी पलीकडे उभ्या असलेल्या जिनिलीयाला जवळ बोलावून घेतलं. ती सुद्धा लगेच यायला निघाली पण, त्याआधीच अजिबात संकोच न बाळगता रतन टाटा स्वत:च्या जागेवरून उठले आणि तिची विचारपूस करण्यासाठी पुढे आले. “एखाद्या स्त्रीला नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी नेहमी स्वत: पुढे जा…” हे त्यांचे शब्द माझ्या मनावर त्या क्षणाला कायमस्वरुपी कोरले गेले.

रतन टाटा सर हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, जे मी शब्दात मांडू शकत नाही. आज अनेक वर्षे उलटूनही त्यांची ती पहिली भेट मी कधीच विसरू शकणार नाही. मिस्टर टाटा, तुम्ही Legend आहात आणि तुमचे विचार, वारसा पुढच्या पिढ्यांना कायम प्रेरणा देतील…तुम्ही सदैव आमच्या स्मरणात राहाल…रितेश देशमुख.

दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. संपूर्ण जगासमोर आदर्श करणाऱ्या रतन टाटांच्या निधनाची बातमी समोर येताच सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे. मराठीसह बॉलीवूड कलाकारांनी विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.