१९९३ साली ‘बाजीगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. ‘बाजीगर’मधील शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवीन असलेल्या शाहरुखसाठी ही भूमिका साकारणे एक मोठे आव्हान होते. परंतु ही नकारात्मक भूमिका साकारत तो एक चतुरस्त्र अभिनेता आहे हे त्याने सगळ्यांसमोर सिद्ध केले.
नुकतंच या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी पोस्ट करत या चित्रपटाशी निगडीत बऱ्याच आठवणी शेअर केल्या. नुकतंच अभिनेता रितेश देशमुख यानेही या चित्रपटाबद्दलची त्याची एक आठवण नुकतीच ‘एक्स'(ट्विटर)च्या माध्यमातून शेअर केली आहे. एका पत्रकाराच्या ट्वीटला उत्तर देताना रितेशने ही आठवण सांगितली. त्या पत्रकाराने ‘बाजीगर’मधील शाहरुख शिल्पा शेट्टीला गच्चीवरून फेकून देण्याच्या सीनमधील एक फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘लोकी’ म्हणून शाहरुख खान अगदी योग्य; किंग खानच्या ‘देवदास’चा संदर्भ देत टॉम हिडलस्टनने केलं वक्तव्य
या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, “हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माझा जन्मसुद्धा झाला नव्हता. त्यामुळे जर माझ्याकडे टाइम मशीन असतं तर मी पुन्हा त्या काळात जाऊन पहिल्या दिवशी पहिला शो पाहताना या सीनवर लोकांची काय प्रतिक्रिया असती ते पाहिलं असतं.” ‘बाजीगर’मधील हा सीन चित्रपटातील सर्वात मोठा ट्विस्ट होता अन् त्याकाळात हा अत्यंत धाडसी प्रकार होता, मुख्य प्रवाहातील चित्रपटात असा खलनायक आणि त्याची ही अशी कृती सहसा पाहायला मिळत नव्हती. आता याच सीनबद्दलची रितेश देशमुखने आठवण शेअर केली आहे.
या ट्वीटला उत्तर देताना रितेश म्हणाला, “मी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता, जेव्हा हा सीन समोर आला तेव्हा संपूर्ण चित्रपटगृहात भयाण शांतता होती, लोकांना असं काही पाहायला मिळेल याची अपेक्षाच नव्हती. नंतर महिन्याभराने मी पुन्हा हा चित्रपट पाहिला अन् याच सीनच्या वेळी लोकांनी टाळ्या वाजवल्या, हे पाहून मला धक्काच बसला.” रितेशने जी प्रतिक्रिया दिली त्यावर बऱ्याच लोकांनी सहमती दर्शवत हा सीन हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक सीन असल्याचंही लोकांनी मान्य केलं.