बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुखला ओळखले जाते. त्यांचे लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलीया या दोघांना रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. अनेकदा ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल विविध किस्से शेअर करताना दिसतात. नुकतंच जिनिलीयाने ती तिच्या मुलांच्या त्वचेची काळजी कशी घेते, याबद्दल सांगितले आहे.
रितेश आणि जिनिलीया नुकतंच करीना कपूरचा ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी चित्रपटसृ्ष्टी, त्यांचे नाते आणि मुलांबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी करीनाने जिनिलीयाला तू तुझ्या मुलांची काळजी कशी घेते? याबद्दल विचारले होते. त्यावर जिनिलीयाने फारच चांगले उत्तर दिले.
आणखी वाचा : “…म्हणून मी मुलांपासून टीव्ही, आयपॅड या गोष्टी दूर ठेवतो” रितेश देशमुखने सांगितले कारण
“मला त्यांची काळजी घ्यायला फार आवडते. पण मी कधीही त्यांच्याबाबत अतिपणाने वागत नाही. कारण प्रत्येक दिवशी नव-नवीन ट्रेंड येत असतो. त्यामुळे मी मुळात बेसिक गोष्टी करण्यावर भर देते. ज्या गोष्टी त्यांना आवडतात, पटतात अशाच गोष्टी मी करत असते. मी त्यांच्या खाण्याकडे विशेष लक्ष देते. कारण त्या गोष्टी निश्चितच फार गरजेच्या असतात. मला असं कायम वाटतं की, तुम्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर, देहबोलीवर दिसतो. म्हणून मी त्याची काळजी करते. मी त्यांना त्वचेची काळजी घेण्यास सांगते. पण मी त्यांना कधीच उन्हात खेळू नका असं सांगत नाही”, असे जिनिलीया म्हणाली.
“माझ्या मुलांनी बाहेर उन्हात जाऊन खेळण्याला मी कधीच विरोध करत नाही. मी कधीच त्यांना ते करण्यापासून अडवत नाही. दुपारचे १२ वाजलेत, आता तुम्ही घरात या असं मी कधीच त्यांना म्हणत नाही. फक्त ज्यावेळी कडाक्याचे ऊन असतं, तेव्हा मात्र मी त्यांना बाहेर जाण्यास मनाई करते, जेणेकरुन त्यांना त्रास होऊ नये.
पण इतर वेळी मी त्यांना उन्हात खेळायला देते. फक्त ते बाहेर खेळायला जाताना मी सनस्क्रिन लावते. त्यांच्या त्वचेचा रंग बदलू नये, यासाठी मी ते करत नाही. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी असायला हवी. ते जसे आहेत तसेच मला ते आवडतात”, असेही जिनिलीयाने सांगितले.
आणखी वाचा : “एलॉन थांब…” ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर शाहिद कपूरचे ट्वीट, म्हणाला “माझ्या ब्लू टिकला हात…”
दरम्यान बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. रितेश आणि जिनिलीयाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.