Riteish Deshmukh Father-In-Law : रितेश आणि जिनिलीया हे दोघंही कायम आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर सुंदर पोस्ट लिहून त्यांना शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळतं. आपली मुलं असो, आई, भाऊ, वहिनी, जवळचे मित्रमंडळी या सगळ्यांना रितेश-जिनिलीया न विसरता शुभेच्छा देत असतात. सध्या अभिनेत्याने लिहिलेली अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. निमित्त आहे रितेशच्या सासरेबुवांच्या वाढदिवसाचं. आज या जोडप्याने नील डिसोझा यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलीयाने आज तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. वडिलांनी खंबीरपणे साथ दिल्याबद्दल अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहेत. जिनिलीयाप्रमाणे रितेश देशमुखने ( Riteish Deshmukh ) सुद्धा लाडक्या सासरेबुवांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. यात रितेश त्यांना काय नावाने हाक मारतो याचा देखील उलगडा झाला आहे.
जिनिलीयाच्या वडिलांसाठी रितेशची खास पोस्ट
रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) आपल्या सासरेबुवांना शुभेच्छा देत लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पॉप्स. तुमच्यातली लढाऊवृत्ती नेहमीच आम्हा सगळ्यांना प्रेरणा देते. आयुष्यात आमच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल तुमचे खूप आभार. याशिवाय तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आयुष्यातील अनेक गोष्टी समजल्या. उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य देऊन, देव तुमचं कायम रक्षण करो #नीलडिसोझा”
रितेशने या पोस्टमध्ये त्याच्या सासरेबुवांचा उल्लेख ‘पॉप्स’ असा केला आहे. याप्रमाणे जिनिलीयाने सुद्धा तिच्या पोस्टमध्ये वडिलांना ‘पॉप्स’ असं म्हटलं आहे. यावरून रितेश आपल्या सासरेबुवांना पॉप्स हाक मारत असल्याचं स्पष्ट होतं.
हेही वाचा : Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन
दरम्यान, रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) आणि जिनिलीयाच्या वडिलांमध्ये अतिशय सुंदर बॉण्डिंग आहे. रितेशने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “जावई आणि सासरेबुवांमधलं नातं असंच पाहिजे” असं देखील अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
याशिवाय रितेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०२५ मध्ये त्याचा बहुप्रतीक्षित ‘हाऊसफुल ५’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल. याशिवाय विवेक ओबेरॉयबरोबर रितेश ‘मस्ती ४’ चित्रपटात सुद्धा झळकणार आहे.
/