रीवा अरोरा एक बालकलाकार आहे. सोशल मीडियावर रीवा अरोराचा मोठा चाहता वर्ग आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातील अखेरच्या सीनमध्ये ती दिसली होती आणि २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ छोट्या गुंजनची भूमिका साकारली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून रीवा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. रीवाचं वय कमी असूनही तिचं ग्लॅमरस असणं नेटकऱ्यांना पटलेलं नाही आणि त्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे. पण यावर आता रीवाने स्पष्टीकरण दिलं आहे.
मागच्या वर्षी रीवा अरोरा मीका सिंहबरोबर एका डान्स व्हिडीओमध्ये दिसली होती. जो अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. नेटकऱ्यांनी यावरून मीका सिंहला खूप ट्रोलही केलं होतं. कमी वयाच्या मुलीबरोबर रोमँटिक डान्स करण्यावरून त्याच्यावर टीका करण्यात आली होती. रीवाच्या आई-वडिलांवरही यावरून टीका करण्यात आली.
आणखी वाचा- “डेटवर गेल्यानंतर मी…”, नोरा फतेहीचा मोठा खुलासा, अर्चना पूरन सिंह झाली थक्क
रीवाने हा व्हिडीओ शूट केला तेव्हा ती केवळ १२ वर्षांची होती असं त्यावेळी बोललं गेलं होतं. त्यानंतर तिच्या आईने असं काहीच नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र रीवाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण नुकतंच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्यावर होत असलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “मी अशाप्रकारच्या टीकेवर कधीच लक्ष देत नाही. मी सकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष देते. जे लोक माझ्यावर प्रेम करतात ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत.”
आणखी वाचा- “मी दोन वर्षांपूर्वीच…”, पंजाबमधील हल्ल्यानंतर कंगना रणौतची पोस्ट चर्चेत
या मुलाखतीत जेव्हा रीवाला तिच्या खऱ्या वयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने तिचं खरं वय सांगण्यास नकार दिला. ती म्हणाली, “याबद्दल लवकरच सर्वांना समजेल पण मी नक्कीच १२ वर्षांची नाहीये.” दरम्यान रीवा तिच्या व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिने मागच्या वर्षी अभिनेता करण कुंद्राबरोबरही एक व्हिडीओ केला होता. ज्यात ती ड्रींक करताना आणि शिव्या देताना दिसली होती.