‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्याबरोबरच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचा ट्रेलरला आणि सगळ्या गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच तुफान कमाई केली आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी जवळ आली आहे. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाच्या बजेटच्या ९०% किंमत कमावली आहे.
हा चित्रपट तयार करण्यासाठी १६० कोटींचा खर्च करण्यात आला. तर आणखी १८ कोटी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी खर्च करण्यात आले. या चित्रपटाचे एकूण बजेट १७८ कोटी आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी बजेटच्या ९०% किंमत आधीच कमावली आहे. या चित्रपटाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राईम व्हिडीओला ८० कोटींना विकण्यात आले आहेत. याचबरोबर या चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार ५० कोटींना ‘कलर्स’ला विकण्यात आले आहेत. तर ‘सारेगमप’ला या चित्रपटाच्या गाण्यांचे हक्क ३० कोटींना विकण्यात आले आहेत. ही सगळी किंमत पकडून या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच १६० कोटींची कमाई केली आहे.
आणखी वाचा : पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकण्यासाठी क्षिती सज्ज, लवकरच दिसणार ‘या’ चित्रपटात
या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आणि उत्सुकता आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात खूप चांगली कामगिरी करेल अशी सर्वांनाच आशा आहे.