करण जोहर दिग्दर्शत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटासह यामधील गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘रॉकी और रानी’ मधील “तुम क्या मिले…” या गाण्याची विशेष चर्चा झाली. या गाण्याचे संपूर्ण शूटिंग काश्मीरमध्ये करण्यात आले होते. या रोमॅंटिक गाण्याचे शूटिंग सुरु करण्यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट खास एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याला भेटायला गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : “नाटकाचे ४४८ प्रयोग केले तरीही…”, प्रिया बापटने सांगितला प्रयोगादरम्यानचा अनुभव; म्हणाली, “पोटात गोळा…”
‘रॉकी और रानी’मधील “तुम क्या मिले…” या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन वैभवी मर्चंटने केले आहे. वैभवी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “तुम क्या मिले…” हे गाणे रणवीर आणि आलिया दोघांसाठीही आव्हानात्मक होते. यापूर्वी रणवीरने फक्त एकदा ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांका चोप्राबरोबर शिफॉन साडी, बर्फाळ प्रदेश अशा धाटणीचे रोमॅंटिक गाणे शूट केले होते. तर, आलियाने सुद्धा ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील “इश्क वाला लव्ह…”नंतर असे गाणे केले नव्हते.
वैभवी पुढे म्हणाली, “प्रेक्षकांनी आधीच शाहरुख आणि काजोलला अशी गाणी करताना पाहिले आहे. त्यामुळे एक नृत्य दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठीही हे आव्हानात्मक होते. मी जेव्हा सगळे आलियाला समजावून सांगितले तेव्हा ती खास शाहरुख खानला भेटायला गेली. शाहरुखची भेट घेऊन तिने टिप्स घेतल्या आणि त्यानंतर ती “तुम क्या मिले…” या गाण्याच्या शूटिंगला आली.”
दरम्यान, “तुम क्या मिले…” या गाण्यातील रणवीर-आलियाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्याला प्रितम यांनी संगीतबद्ध केले असून हे गाणे अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. या चित्रपटात आलिया-रणवीरसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.