करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘रॉकी और रानी…’ प्रदर्शित झाल्यावर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यामधील लिपलॉक सीनची बरीच चर्चा रंगली होती. याबाबत आता चित्रपटाची संवाद आणि पटकथा लेखिका इशिता मोईत्रा हिने प्रतिक्रिया दिली आहे.
‘रॉकी और रानी’ची संवाद लेखिका इशिता मोईत्रा ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यामधील लिपलॉक सीन पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण, तो सीन चित्रपटाच्या स्क्रिप्टचा आधीपासूनच एक भाग होता. सीन लिहिताना त्यात सभ्यता राखावी हे करणचे पहिल्या दिवसापासून म्हणणे होते. मला वाटत नाही की, त्यांच्यापैकी कोणालाही या सीनबाबत काही समस्या आहेत.”
इशिता पुढे म्हणाली, “शबाना आझमी या माझ्या पहिल्यापासून आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांचा बंगाली भाषेवरचा प्रभाव पाहून मी स्वत: आश्चर्यचकीत झाले होते. याउलट आलियाला बंगाली भाषा शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. शबानाजी यांनी अपर्णा सेनसह यापूर्वी एक बंगाली चित्रपट केला होता. त्यामुळे डबिंग करतानाही प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग बरोबर आहे की नाही? याची त्या खात्री करत होत्या.”
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.