बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)वर गुरूवारी पहाटे हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथे ही घटना घडली आहे. सध्या अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. आता या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
“सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही, हा खरा प्रश्न आहे”
आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करीत लिहिले, “अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा! पण या हल्ल्याच्या निमित्ताने राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली, हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडत असून मुंबईत वांद्रे सारख्या भागातही सुरक्षित वातावरण नाही, हे चिंताजनक आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय? सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही, हा खरा प्रश्न आहे”, असे म्हणत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा: Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया, डॉक्टर म्हणाले; “आम्ही…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे एक दरोडेखोर अभिनता सैफ अली खान व करीना कपूर यांच्या वांद्रे येथील घरात शिरला होता. यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. या झटापटीत अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेला व मणक्याला दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे.