अजय देवगण व रोहित शेट्टीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ‘सिंघम’ या चित्रपटाचे नाव निश्चितपणे टॉप लिस्टमध्ये सामील होईल. अजयने आतापर्यंत सिंघम आणि सिंघम रिटर्न्समधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता अजय देवगण आणि रोहीत शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. मध्यंतरी या ‘कॉप युनिव्हर्स’मध्ये रणवीर सिंगच्या ‘सिंबा’ अन् अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ची या चित्रपटांचीही भर पडली. पण सिंघमची क्रेझ आजही तशीच आहे.
सिंघमचा तिसरा भाग अर्थात ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘सिंघम अगेन’ मोठ्या पडद्यावर झळकणार असून याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. नुकतंच ‘सिंघम अगेन’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून याच्या मुहूर्ताचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : इरफानशी दोन वर्षं विशाल भारद्वाज यांनी केलं नव्हतं भाष्य; ‘या’ कारणामुळे उडालेले खटके
पूजा करत रोहित शेट्टी अन् त्याच्या संपूर्ण टीमने चित्रपटाला सुरुवात केल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी रोहितसह अजय देवगण अन् सिंबाच्या लूकमध्ये रणवीर सिंगसुद्धा हजर होते. तिघांनी मिळून प्रार्थना करत या नव्या चित्रपटाचा शुभारंभ केला आहे. अक्षय कुमार मात्र काही कारणास्तव यासाठी हजर नसल्याने त्यानेही हे फोटो शेअर केले आहेत.
ही पोस्ट शेअर करताना अक्षय लिहितो, “मी सध्या परदेशात असल्याने त्या फ्रेममध्ये शरीराने नाही पण मनाने मात्र मी तिथेच आहे. ‘सिंघम अगेन’च्या सेटवर तुम्हाला लवकरच भेटायची प्रचंड उत्सुकता आहे. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर आहेत.” सिंघम अगेनमध्ये पुन्हा बाजीराव सिंघम, सिंबा व सूर्यवंशी अशी तीनही पात्रं धमाल करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षक सध्या या कॉप युनिव्हर्समधील या आगामी चित्रपटाची आठवणीने वाट बघत आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ ला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे, नुकतंच निर्मात्यांनी याची तारीख जाहीर केली, त्यामुळे पुढील वर्षी नॉर्थ विरुद्ध साऊथ असा जबरदस्त मुकाबला आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे.