अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला सिंघम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने अजयला ‘बॉलीवूडचा सिंघम’ ही ओळख मिळवून दिली. रोहित शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागही आला, ज्याचं नाव होतं ‘सिंघम २’. तर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर रोहित शेट्टीने काही दिवसांपूर्वीच सिंघमच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली. या आगामी चित्रपटाचं नाव ‘सिंघम अगेन’ असं असेल. रोहित शेट्टी आणि त्याच्या टीमने या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. आता या चित्रपटात कोणकोण कलाकार काम करणार हे समोर आलं आहे.
आणखी वाचा : रोहित शेट्टीला प्रिय ‘हा’ मराठमोळा पदार्थ, खुलासा करत म्हणाला…
‘सिंघम अगेन’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. याचं कारण म्हणजे, या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसेल. तर या व्यतिरिक्त या चित्रपटात करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमारही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. जॅकी श्रॉफ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार आहेत.
रोहित शेट्टी गेली दीड वर्ष या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. तो या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटाचं शूटिंगही उत्तम सुरु आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.