रोहित शेट्टीचा प्रत्येक चित्रपट दरवेळी चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोच. इतकंच नव्हे तर रोहित शेट्टीचे बहुतांश चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. मात्र गेल्या वर्षी याउलट चित्र आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले. रोहित शेट्टीने २०२२ साली सर्कस हा चित्रपट आणला. ज्यामध्ये रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर असे अनेक मोठे कलाकार होते. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
‘सर्कस’सारख्या चित्रपटाचं अपयश पचवायला रोहितला थोडा वेळ लागला कारण त्याने बॉक्स ऑफिसवर सलग सुपरहीट चित्रपट दिले होते. ‘सर्कस’च्या फ्लॉप होण्याबद्दल नुकतंच रोहितने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : शाहरुख खान किंवा टॉम क्रूझ नव्हे; ‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता, जाणून घ्या
‘इंडिया टूडे’शी संवाद साधताना रोहितने सांगितलं की त्याला त्याच्या आजूबाजूला खरं बोलणारी लोक हवी आहेत, कारण जेव्हा त्याचा चित्रपट फ्लॉप होईल तेव्हा त्याला याची जाणीव ती लोक करून देतील. रोहित पुढे म्हणाला, “यश किंवा अपयश स्वीकारण्यात कोणताही कमीपणा वाटला नाही पाहिजे. ‘सिंघम’, ‘गोलमाल’ हे चित्रपट सुपरहीट ठरले ते माझेच आहेत, पण ‘दिलवाले’, ‘जमीन’, ‘सर्कस’सारखे चित्रपट आपटले तरीही ते माझेच आहेत.”
“एखादा चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यासाठी इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.” कोविड काळात ५०% आसनक्षमता असतानाही रोहितच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं, पण त्यानंतर आलेल्या ‘सर्कस’ने मात्र प्रेक्षकांची घोर निराशा केली. आता लवकरच रोहित शेट्टी ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’ फ्रेंचाइजीच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे.