रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये बॉलिवूडसह मराठी कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण चित्रपटाच्या पहिल्या दिवशी ‘सर्कस’ला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं बोललं जात आहे.
‘सर्कस’ चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ८ ते १० कोटी रुपये कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पण चित्रपटाच्या आगाऊ तिकीट बुकिंगमध्येही ‘सर्कस’ मागे पडला आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, चित्रपट प्रदर्शनापूर्वी ३२ हजार तिकिटांची विक्री झाली आहे.
‘सर्कस’चे देशभरात १० हजार शोज आहेत. तसेच ३२०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ७० कोटी रुपयांचा बजेट असलेल्या ‘सर्कस’ला सध्या अपेक्षेपेक्षा प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. रणवीरची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. तर पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव आदी कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
‘सर्कस’कडून प्रेक्षकांना बरीच अपेक्षा आहे. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला कितपत प्रतिसाद मिळणार हे येत्या काही दिवसांत समजेल. तसेच येत्या विकेण्डला चित्रपटाच्या कमाईमध्ये किती भर पडणार? हे पाहावं लागेल.