दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डबल डोस असतो. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स सारं काही एकत्र त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं. सूर्यवंशी हा त्याचा शेवटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता प्रेक्षक त्याच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेली बरीच वर्षं या चित्रपटावर काम सुरू आहे.
अखेर या चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून नुकतंच याचं टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीने रोहित शेट्टीच्या या आगामी चित्रपटाचं टीझर सादर करण्यात आलं आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे हे आपल्याला माहीत होतंच, पण या चित्रपटाच्या टीझरच्या माध्यमातून यातील प्रत्येक पात्राची ओळख करून देण्यात आली आहे.
आणखी वाचा : चित्रपटविश्वाचं समीकरण बदलणारा ‘पुष्पक’ झाला ३५ वर्षांचा; कमल हासन यांचं दिग्दर्शकासाठी भावूक ट्वीट
हा चित्रपट १९६० या काळातील कथानक आपल्यासमोर मांडणार आहे. टीझरमध्येसुद्धा याच गोष्टीवर भर देण्यात आला आहे. त्या काळात इंटरनेट आणि औद्योगिक क्रांति झाली नसल्याने तेव्हाचं आयुष्य कसं साधं होतं हे वारंवार प्रत्येक पात्राच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. प्रत्येक पात्र यामध्ये एका वेगळ्याच अवतारात आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाय हा टीझर पाहून कॉमेडीचा डबल डोस अनुभवायला मिळणार असल्याचंही स्पष्ट होत आहे.
या चित्रपटात रणवीर सिंगसह जॅकलीन फर्नांडिज, पूजा हेगडे, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, संजय मिश्रा, जॉनी लिवर, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधवसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणवीर आणि रोहित शेट्टीचा हा ‘सर्कस’ गुलजार यांच्या ‘अंगूर’ चित्रपटावर बेतलेला आहे. या चित्रपटाची प्रेरणा गुलजार यांना शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या कथेवरुन मिळाली होती. याचा ट्रेलर २ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २३ डिसेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापाठोपाठ रणवीर आणि आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे.