दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ आगामी चित्रपट गेले काही दिवस जोरदार चर्चेत आहे. पुढील आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती सगळी जण विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ असो, ‘सिम्बा’ असो वा आताचा ‘सर्कस’; त्याच्या चित्रपटात अनेक मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात. ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या वेळी रणवीर आणि साराने एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडून मराठीचे धडे घेतले होते. ती अभिनेत्री कोण याचा खुलासा नुकताच रोहितने केला आहे.

‘सर्कस’च्या संपूर्ण टीमने नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी भरपूर मजा मस्ती केली. रोहितच्या अनेक मराठी डायलॉगही असतात. पण प्रमुख भूमिकेत असलेले हिंदी कलाकार हे मराठी डायलॉग कसे बोलतात आणि त्यांना ते कोण शिकवत याबद्दलही त्यांनी या कार्यक्रमात चर्चा केली. हे सिक्रेट शेअर करताना रोहितने त्याच्या ‘सिम्बा’ या चित्रपटादरम्यानची एक आठवण सांगितली.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’चा वाद संपेना; त्यातच ‘पठाण’मधील दुसऱ्या गाण्याच्या प्रदर्शनाबद्दल शाहरुख खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

रोहित म्हणाला, “सिंबा या चित्रपटात रणवीर आणि सारा साकारत असलेल्या व्यक्तिरेखा मराठी होत्या. त्यामुळे त्यांच्या तोंडी अनेक मराठी वाक्य होती. या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिने एका न्यायाधीशाची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका या चित्रपटात जरी छोटीशी असली तरी ती संपूर्ण शूटिंगमध्ये आमच्यासोबत असायची. याचं एकमेव कारण म्हणजे रणवीर आणि साराला मराठी शिकवणं हे होतं. आमच्या सेटवरची जणू ती संवाद दिग्दर्शिकाच होती. तिने रणवीर आणि साराला मराठीचे धडे दिले.”

हेही वाचा : चर्चा रणवीर सिंगच्या दिलदारपणाची! स्पर्धकाच्या आवाजावर फिदा झालेल्या अभिनेत्याने त्याला दिली ‘ही’ मौल्यवान भेट

रोहितच्या या बोलण्याने अश्विनी भारावून गेली. ‘सिम्बा’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल अश्विनीनेही रोहितचे आभार मानले. तर आता अश्विनी रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटात एका हटके भूमिकेत दिसणार आहे.