रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. बॉलिवूडमध्ये ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलमाल’ असे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर रोहित शेट्टीने आता ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रोहितने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत.
‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टीने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. चित्रपटांमध्ये गाड्यांची धमाकेदार अॅक्शन दाखवणाऱ्या रोहित शेट्टीला लहानपणापासूनच गाड्यांचं वेड होतं. याबाबतचा एक किस्सा रोहित शेट्टीने मुलाखतीत सांगितला.
हेही वाचा>> “पोलिसांचं आयुष्य फार कठीण आहे”, रोहित शेट्टीचं वक्तव्य, म्हणाला “सिंघम चित्रपटामुळे…”
“मी सात-आठ वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी नवीन ऑटोमेटेड एसयुव्ही गाडी खरेदी केली होती. ती गाडी ऑटोमेटेड असल्यामुळे लगेच सुरू होते, हे मला माहीत होतं. माझे वडील झोपलेले असताना मी गाडीची चावी घेतली आणि ती सुरू केली. मी तेव्हा खूप लहान होतो. त्यामुळे एक्सलेटरवर पाय पडल्यानंतर गाडीवरचा माझा कंट्रोल सुटला. ती गाडी घराचा गेट तोडून, रस्त्यापलीकडे असलेल्या नाल्यात गेली. त्यानंतर माझ्या वडिलांनी पुन्हा असं करू नकोस, असं मला बजावलं,” असं रोहितने सांगितलं.
रोहित शेट्टीची निर्मिती असलेला ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ हा चित्रपट १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश व करण किशोर मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीनेही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.