रोहित शेट्टी हा त्याच्या अ‍ॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असतो. ‘सिंघम’, ‘सूर्यवंशी’, ‘सिंबा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करतात. परंतु रणवीर सिंह अभिनीत ‘सर्कस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. कोविड दरम्यान बनलेला हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाच्या अपयशाबाबत नुकतंच रोहित शेट्टीने आपलं मत व्यक्त केलं. जर मला आज ‘सर्कस’ हा चित्रपट बनवण्याबद्दल विचारलं तर मी नक्कीच नकार देईन. पण मी हा चित्रपट करोना महामारीच्या काळात आपल्या टीमला काम मिळाव आणि त्यांनी कामात व्यस्त राहाव यासाठी केला होता, असं त्याने सांगितलं. यात रणवीर सिंहने दुहेरी भूमिका साकारली होती आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता.

हेही वाचा… Bigg Boss 17 मध्ये अंकिता लोखंडेच्या पतीने प्रसिद्धी अन् पैसा दोन्ही कमावलं, विकी जैनला शोसाठी मिळालं ‘इतकं’ मानधन

रोहित ‘एएनआय’ दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “या चित्रपटाची निर्मिती आम्ही कोविड दरम्यान केली होती. तेव्हा कोरोनामुळे स्थिती बिकट झाली होती. आज जर मला कोणी म्हटलं की हा चित्रपट बनव तर मी त्यास नकार देईन. तेव्हा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाला नव्हता, ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेब सीरिज सुरू होणार होती. कोविडमुळे आमच्याकडे ८ महिन्यांचा ब्रेक होता. तेव्हा आम्ही काय करायला हवं होतं? आमचे सहकारी घरी बसले होते, काहीच काम नव्हतं आणि ही स्क्रिप्ट खूप आधीपासून आमच्याकडे होती. हा एक साधा सोप्पा लहान चित्रपट बनेल, असा मी विचार केला. यामुळे मी माझ्या टीमलाही व्यग्र ठेऊ शकतो आणि मी सुद्धा कामात व्यग्र राहीन या भावनेने मी कामाला सुरूवात केली. हा चित्रपट पूर्णपणे स्टुडिओमध्ये शूट केला गेला होता, यात ना कार उडाली होती ना कोणते अ‍ॅक्शन सीन्स होते.”

हेही वाचा… Bigg boss 17 मधून बाहेर येताच विकी जैनची गर्ल गँगबरोबर पार्टी; अंकिता लोखंडे म्हणाली, “मी नसताना घरी कोण कोण आलं, ते…”

पुढे रोहीत म्हणाला, “कोविडच्या निर्बंधानंतर शूटिंग सुरू झालेला ‘सर्कस’ हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटादरम्यान आमचा खूप खर्च झाला कारण प्रत्येक आठवड्याला रक्त तपासणी, करोनाची चाचणी सुरू होतं. चित्रपटासाठी काम करणं खूप कठीण होतं. खरंतर आम्ही सगळे सूर्यवंशीच्या तयारीसाठी वाट पाहत होतो. पण ‘सर्कस’ हा एक साधा विषय होता. म्हणून मी विचार केला की यामुळे किमान टीममधील लोकांचा उदरनिर्वाह होईल आणि ते व्यग्रही राहतील.”

सर्कस चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात अपयशी ठरला. पण रोहितने यासाठी प्रेक्षकांवर कोणताही राग व्यक्त केला नाही. रोहित म्हणाला, “प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे आणि जर त्यांना वाटल असेल की या चित्रपटात काहीतरी चुकीचं आहे तर नक्कीच काहीतरी गडबड असेल. हे नाकारता येणार नाही. लोकांना कथा आवडली नसावी.”

सध्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सीरिजद्वारे रोहित शेट्टीने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. त्याच्या आगामी चित्रपटाबाबत सांगायचं झाल्यास तो ‘सिंघम अगेन’वर काम करत आहे आणि या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर, रणवीर सिंह आणि इतर अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit shetty talked about ranveer singh circus flop movie on box office movie was made for earnings in covid dvr