करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला असून ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’२८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या टीझरमध्ये प्रेम आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळत आहे. टीझरद्वारे चित्रपटातील सगळ्या कलाकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे १ मिनिट १९ सेकंदाच्या या टीझरमध्ये एकही डायलॉग नसून पार्श्वभूमीला अरिजित सिंहचे “तुम क्या मिले…” हे सुंदर गाणे ऐकू येत आहे. चित्रपटाच्या टीझरमधील प्रत्येक दृश्यात सस्पेन्स दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.
हेही वाचा : “…म्हणून मी मालवणी बायको केली” ‘त्या’ प्रश्नावर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल
रणवीर, आलिया आणि करण जोहर यांनी टीझर रिलीजच्या एक दिवस आधी नव्या पोस्टरसह चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर केली होती. चित्रपटात रणवीर सिंहचे रॉकी रंधवा आणि आलिया भट्ट राणी चॅटर्जीची भूमिका साकारणार आहे. टीझरमध्ये आलियाने बहुतांश सीन्समध्ये साडी नेसलेली दिसत आहे. ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे.
आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.