बॉलीवूड अभिनेता रोनित रॉय याने १९९२ साली ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘कसोटी जिंदगी की’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ अशा हिंदी मालिकांतून रोनित रॉय प्रसिद्धीझोतात आला. अभिनेता रोनित रॉय सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी तो प्रेक्षकांबरोबर शेअर करताना दिसतो. सध्या त्याने स्विगी कंपनीला केलेली एक्स पोस्ट चर्चेत आली आहे.
रोनित रॉयने नुकतंच त्याच्या एक्स अकाउंटवर स्विगी कंपनीला टॅग करून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो म्हणाला, “मी तुमच्या एका चालकाला जवळजवळ मारले असते. त्यांना निश्चितपणे गाडी कशी चालवायची याची सूचना देणे आवश्यक आहे. त्या छोट्या इलेक्ट्रिक मोपेड्स चालवण्याचा अर्थ असा नाही की ते चुकीच्या दिशेने गाडी चालवतील. तुम्हाला त्यांच्या जिवाची पर्वा आहे की नाही? की तुम्ही नेहमीच असा व्यवसाय करता.”
रोनितचं हे ट्विट व्हायरल झालं आणि त्यावर स्विगी कंपनीने त्यांची प्रतिक्रिया दिली, “रोनित, आमचे डिलिव्हरी पार्टनर्स सर्व रहदारी नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा आम्ही करतो आणि या घटनेकडे लक्ष देत आवश्यक कारवाई करण्यासाठी तुमच्याजवळ काही माहिती उपलब्ध असल्यास द्यावी”, असं स्विगी कंपनीने नमूद केलं. यावर एका नेटकऱ्याने त्याची प्रतिक्रिया देत लिहिले, “त्यात स्विगीचा दोष कसा? चुकीच्या बाजूने गाडी न चालवणे हा मूलभूत नागरी नियम नाही का?”
हेही वाचा… सारा अली खानचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली तिची आजी; म्हणाले, “ज्युनियर शर्मिला…”
रोनितच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रोनित रॉय आणि त्याची पत्नी नीलम रॉय यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पुनर्विवाह केला. २०वा वाढदिवस साजरा करत दोघांनी गोव्यातील एका मंदिरात पुन्हा लग्न केले. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ रोनितने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोजला कॅप्शन देत रोनितने लिहले, “माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करशील का?” तीन वर्षे डेट केल्यानंतर २००३ साली रोनित आणि नीलम विवाहबंधनात अडकले. त्यांना अडोर आणि अगस्त्य नावाची दोन मुले आहेत.
दरम्यान, अभिनेता रोनित रॉय २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘फर्रे’ या चित्रपटात शेवटचा झळकला होता. सौमेंद्र पाधी दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटात अलीजेह अग्निहोत्री, साहिल मेहता, झेन शॉ, प्रसन्ना बिष्ट, जुही बब्बर आणि शिल्पा शुक्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २०१७ च्या ‘बॅड जिनियस’चा रिमेक आहे. भारताच्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फर्रे’चा प्रीमियर प्रदर्शित झाला होता.