अभिनेत्री स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्याशी या वर्षाच्या सुरुवातीला रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. स्वराने एक व्हिडीओ पोस्ट करत ही बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर केली होती. यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलं. तर आता एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. स्वरा जुलैमध्ये आई झाली असल्याची चर्चा ट्विटरवर सध्या रंगली आहे. लग्नानंतर अवघ्या साडेचार महिन्यांत ती आई झाली असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं जात आहे.
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी उपरोधाने एक ट्वीट करत स्वराला ट्रोल केलं. या ट्वीटवर कमेंट्स करत अनेकांनी स्वराचं अभिनंदन केलं. पण त्यांचं हे ट्वीट अनेकांना आवडलं नाही आणि ही स्वराची वैयक्तिक बाब आहे, असं म्हणत अनेकांनी महंत राजुदास यांच्या या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “धर्मांतर केल्यानंतर तुझं…” फहाद अहमदबरोबर गुपचूप लग्न उरकल्यानंतर स्वरा भास्कर ट्रोल
महंत राजुदास यांनी ट्वीट करत लिहिलं, “स्वराने साडेचार महिन्यांनीच बाळाला जन्म देऊन वेळेच्या आधी काम पूर्ण करणाऱ्या गडकरीजींना आरसा दाखवला.” त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करू लागले आहेत. एकाने लिहिलं, “तुम्ही देवाचं ध्यान करा. स्वरा भास्करच्या गर्भावस्थेबाबत चिंता करू नका. तुम्हाला हे शोभत नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “लाज वाटते तुला महंत म्हणायला, कारण तुम्ही अशा अफवा पसरवत आहात.” तर आणखी एकाने लिहिलं, “महंत असूनही तुम्ही अशा अफवा पसरवत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का?”
हेही वाचा : “इस्लाम धर्मात होळी…” हळदीच्या फोटोंमुळे स्वरा भास्कर ट्रोल
दरम्यान, स्वरा भास्करने फेब्रुवारी महिन्यात फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली. तर त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी लग्नाचे मेहंदी, हळद समारंभही साजरे केले होते. तर आता ती आई झाल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. पण अद्यापही स्वरा किंवा फहादने याबद्दल कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.