Chhaava Movie : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आलिया भट्ट, करण जोहर, आयुष्यमान खुराना, राजकुमार राव, सोफी चौधरी या कलाकारांपाठोपाठ आता बॉलीवूड गाजवणाऱ्या आणखी एका अभिनेत्रीने विकीचं कौतुक केलं आहे. याशिवाय या अभिनेत्रीने दिग्दर्शक आणि निर्मात्यांचेही सुद्धा आभार मानले आहेत. या अभिनेत्रीचं नाव आहे श्रिया पिळगावंकर.
१४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा चालू आहे. सचिन पिळगांवकरांच्या एकुलत्या एक लेकीने सुद्धा नुकताच हा सिनेमा पाहिला. श्रियाने ‘छावा’ पाहिल्यावर खास पोस्ट शेअर केली आहे.
श्रिया लिहिते, “विकी कौशल काय आहेस तू!!! विकी तू भरपूर प्रेम आणि कौतुकास पात्र आहेस. प्रेक्षकांचं हे प्रेम तू कमावलं आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा! अभिनंदन लक्ष्मण सर… छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, त्यांची शौर्यगाथा दाखवणारा हा चित्रपट बनवल्याबद्दल ‘मॅडडॉक फिल्म्स’ तुमचेही आभार…”
याशिवाय करण जोहर ‘छावा’ सिनेमाचं कौतुक करत म्हणाला होता, “छावा…! या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन… चित्रपटाला असंच यश मिळत राहूदे! तो शेवटचा क्षण सर्वांनाच भावनिक करून जातो. विकी कौशल तुझ्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक फ्रेममध्ये तू जीव ओतून काम केलं आहेस. या सगळ्यात अक्षय खन्ना सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. दिनू ( दिनेश विजन ), लक्ष्मण आणि ‘मॅडडॉक फिल्म्स’ सर्वांचं खूप खूप अभिनंदन!”

दरम्यान, ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर नऊ दिवसांत २९३.४१ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमात भारतात लवकरच ३०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ‘छावा’मध्ये अनेक मराठी कलाकार देखील झळकले आहेत. संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, नीलकांती पाटेकर या सगळ्या कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत.