‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकणारी बॉलिवूड अभिनेत्री क्रिसन परेरा हिला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात क्रिसन सध्या शारजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, ती जवळपास दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. भारतीय दूतावासाने अभिनेत्रीच्या अटकेची माहिती कुटुंबीयांना दिली आहे.
मात्र, या प्रकरणातील क्रिसन ही आरोपी नसून पीडित असल्याचा तिच्या कुटुंबाने दावा केला आहे. एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, क्रिसन परेरा शारजाह विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. तेव्हापासून तिचे कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. भारतीय दूतावासाने सांगितले की अभिनेत्रीला अटक केल्यानंतर ७२ तासांनंतर ही माहिती देण्यात आली आहे.
क्रिसन परेराच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “तिला रवी नावाच्या व्यक्तीने फसवले. त्याने सर्वप्रथम क्रिसनची आई प्रेमिल परेरा यांच्याशी संपर्क साधला. रवी नावाच्या या व्यक्तीने सांगितले की तो एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. आईने रवीची ओळख क्रिसनशी करून दिली. काही भेटीनंतर दुबईत वेब सीरिजसाठी ऑडिशन होणार असल्याची चर्चा सुरू होती. तिच्या प्रवासाचे संपूर्ण बुकिंग रवीनेच केले होते.”
क्रिसनच्या आईने सांगितले की, दुबईला जाण्यापूर्वी रवीने क्रिसनला एक ट्रॉफी दिली. तो स्क्रिप्टचा भाग असल्याचे त्याने सांगितले. या ट्रॉफीमुळेच क्रिसनला विमानतळावर अधिकाऱ्यांनी पकडले तेव्हा त्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर १० एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचे आरोप लावले. दरम्यान, रवी नावाची व्यक्ती सध्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा : DDLJ मध्ये शाहरुखबरोबर दिसले असते मिलिंद गुणाजी; ‘या’ कारणामुळे निसटली हातातून भूमिका
क्रिसन परेराच्या कुटुंबाने दुबईत वकील नेमला आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की वकिलाची फी १३ लाख रुपये आहे आणि ते त्यांच्या मुलीला सुखरूप परत आणण्यासाठी घरदेखील गहाण ठेवायला तयार आहेत, कारण या प्रकरणात २०-४० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. क्रिसन परेराच्या कुटुंबीयांनी ड्रग तस्कर रवीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला, परंतु पोलिस यूएई सरकारकडून आरोपांच्या अधिकृत प्रतीची वाट पाहत असल्याचं स्पष्ट झालं आहे.