Sagarika Ghatge on interfaith marriage with Zaheer Khan: अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटर झहीर खान यांना नुकताच मुलगा झाला आहे. सागरिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करीत त्यांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली. तसेच त्याचे नाव फतेह सिंह खान असल्याचेदेखील उघड केले.
सागरिका व झहीर खान यांचे आंतरधर्मीय लग्न झाले आहे. याआधी अनेक मुलाखतींतून तिने याबद्दल वक्तव्य केले आहे. जेव्हा सागरिकाच्या वडिलांना सागरिका व झहीर यांच्या नात्याबद्दल समजले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती. त्यांनी या लग्नाला लगेच होकार दिला का, यावर सागरिकाने वक्तव्य केले होते. तिने म्हटले होते की, तिचे पालक आधुनिक विचारसरणीचे आहेत आणि त्यांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. पण, त्यांनी झहीर खानची पार्श्वभूमी तपासली होती,असाही खुलासा तिने केला होता.
माझ्या वडिलांना माझ्या आणि झहीरच्या नात्याबद्दल…
सागरिका घाटगेने ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सागरिका म्हणाली, “जेव्हा माझ्या वडिलांना माझ्या आणि झहीरच्या नात्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी झहीरचे कोच अंशुमन गायकवाड यांना मेसेज केला. ते आमचे नातेवाईक होते. त्यानंतर अंशुमन गायकवाड यांनी झहीरला मेसेज केला की, मी ऐकलेय की, तुझी माझ्या भाचीबरोबर मैत्री आहे. झहीरने मला तो मेसेज दाखवला आणि मला म्हणाला की, मी याचं उत्तर देणार नाही. मी त्याला सांगितलं की मला याबद्दल काहीही माहीत नाही.”
पुढे सागरिका म्हणाली, “माझ्या वडिलांनी झहीरची पार्श्वभूमी योग्य पद्धतीनं तपासली. त्यानंतर ते म्हणाले की, झहीर उत्तम क्रिकेटर्सपैकी एक आहे. सगळ्यांनी त्यांना हेच सांगितले होते. पण, मला वाटते की, वडील म्हणून त्यांची काळजी योग्य होती.”
अभिनेत्री तिच्या व झहीरच्या वेगवेगळ्या धर्माबद्दल बोलताना म्हणाली, “माझे पालक आधुनिक विचारसरणीचे आहेत. यावर चर्चा झाल्या आहेत. नाही असे नाही. पण, मला वाटते की माझ्यासाठी योग्य व्यक्ती महत्त्वाची आहे. ज्याच्याबरोबर मला माझं संपूर्ण आयुष्य शेअर करायचं आहे.आमच्या दोघांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि हीच आमच्या नात्याची सुंदरता आहे.” सागरिकाने व्यक्ती महत्त्वाची असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, सागरिकाची ‘चक दे इंडिया’मधील भूमिका चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले आहे.