महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) साहिल खानला अटक केली आहे. त्याला एसआयटीकडून डिसेंबर महिन्यात समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु, तो चौकशीसाठी हजर राहिला नव्हता.

महादेव बेटिंग ॲपचा प्रसार आणि प्रचार केला हे साहिलला समन्स बजावण्याचं प्राथमिक कारण होतं. ॲपचा प्रचार करून त्याने मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या साहिलची चौकशी चालू आहे. पोलिसांनी कारवाई करताच अभिनेत्याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. महादेव बेटिंग हे ॲप बेकायदेशीर असून त्यात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतले आहेत. यासाठी बनावट बँक खाती उघडण्यात आली होती. त्यासाठी वेगवेगळ्या बनावट सिमकार्डचा वापर देखील करण्यात आला होता.

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा ‘चाक धूम धूम’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला शाहरुख खान, म्हणाले…

साहिल खानला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी त्याच्या निवासस्थानी भेट दिली. वारंवार प्रयत्न करूनही तो सापडला नाही म्हणूनच त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. अखेल साहिल खानला छत्तीसगडमधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.

हेही वाचा : “राज साहेबांनी घरी बोलावलं, ठाकरे-पवारांचा फोन आला अन्…”, संकर्षण कऱ्हाडेच्या ‘त्या’ राजकीय कवितेनंतर काय घडलं? म्हणाला…

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे माटुंगा येथे साहिल खान याच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबईतून गोवा, कर्नाटक, हैदराबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. अखेर ४० तास पाठलाग केल्यानंतर आज छत्तीसगढमधील जगदलपूर येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

Story img Loader