‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारून अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या काही वर्षांत अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच सई आणखी काही बॉलीवूड चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रिती सेनॉनच्या ‘मिमी’ चित्रपटात सईने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा मानाचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना नेमकं काय घडलं याबद्दलचा किस्सा अभिनेत्रीने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

सई म्हणाली, “माझ्यासाठी ती खरंच भारी फिलिंग होती. कारण, फिल्मफेअर सोहळा आपण सगळेच लहानपणापासून बघत आलो आहोत. हिंदी फिल्मफेअरच्या रंगमंचावर मला पुरस्कार मिळेल या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. पण, आयुष्यात अशा काही अविश्वसनीय गोष्टी घडतात अन् यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर, स्वप्नांवर पुन्हा एकदा घट्ट विश्वास बसतो. माझ्यासाठी तो दिवस खूपच खास ठरला.”

हेही वाचा : “गणितात फक्त ३ गुण…”, मालिकाविश्व गाजवणारी जुई गडकरी अकरावीत झालेली नापास; सांगितला मजेशीर किस्सा

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील एक किस्सा सांगताना सई म्हणाली, “मला पुरस्कार प्रदान करण्यासाठी अनुपम खेर येणार होते. तेव्हा अनिल कपूर सरांनी बॅकस्टेजला अनुपम सरांना एक चष्मा दिला होता. तुमच्यावर खूप भारी दिसेल तुम्ही हाच चष्मा घाला असं त्यांनी अनुपम सरांना सांगितलं. ते सुद्धा चष्मा घालून आले… पण, नेमकं विजेत्याचं नाव घोषित करताना कार्डावर काय लिहिलंय हे त्यांना वाचताच येईना. कदाचित त्यांना चष्म्यातून काहीच दिसलं नसेल आणि ते माझं नाव वाचू शकले नाहीत. अशावेळी रणवीरने माझं नाव वाचलं. कारण, त्याला माझ्या नावाचा उच्चार अगदी व्यवस्थित माहिती होता.”

हेही वाचा : वडील रवींद्र महाजनींवरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “सर्वकाही…”

“पुरस्कार सोहळ्यात असं सगळं घडल्यावर दुसऱ्या दिवशी मला अनुपम सरांचा मेसेज आला. I am Sorry…मला तुझं नाव माहिती नव्हतं वगैरे अशातला काहीच भाग नाहीये. त्या चष्म्यामुळे मला काहीच दिसलं नाही. त्यांनी मला संपूर्ण किस्सा सांगितला, मला खरंच खूप समाधान वाटलं. कारण, एवढ्या मोठ्या ज्येष्ठ अभिनेत्याला मला मेसेज करून काय घडलं हे सांगण्याची काहीच गरज नव्हती. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. अशा गोष्टी आपल्याला आयुष्यात खूप बळ देतात.” असं सई ताम्हणकरने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar reveals backstage incident happened on filmfare awards set sva 00