Saif Ali Khan Attacker Details : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास (३०) याच्याबद्दल पोलीस तपासात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आरोपी सात महिन्यांपूर्वी डौकी नदी ओलांडून भारतात आला होता. नंतर तो पश्चिम बंगालमध्ये गेला आणि तिथे काही आठवडे राहिला. सिमकार्ड मिळविण्यासाठी त्याने तेथील रहिवाशाचे आधार कार्ड वापरले. तिथून मग तो नोकरीच्या शोधात मुंबईला आला.
प्राथमिक तपासात आढळलेल्या माहितीनुसार, आरोपीने वापरलेले सिमकार्ड पश्चिम बंगालमधील ‘खुकुमोनी जहांगीर सेख’ या नावाने रजिस्टर्ड आहे. आरोपीने सिमकार्ड घेण्यासाठी त्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरल्याचा संशय आहे, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. शरीफुल इस्लाम काही आठवड्यांसाठी पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यात फिरल्याचा संशय पोलिसांना आहे. तिथे त्याने आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
रोजगाराच्या शोधात आलेला भारतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफुल इस्लामने पोलिसांना सांगितलं की, तो बांगलादेशमध्ये १२वीपर्यंत शिकला होता, त्याला दोन भाऊ आहेत आणि तो रोजगाराच्या शोधात भारतात आला होता. त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवरील डौकी नदी ओलांडली, असा दावा त्याने केला आहे. त्याने भारतात राहण्यासाठी विजय दास हे खोटे नाव वापरले. पश्चिम बंगालमध्ये काही आठवडे राहिल्यानंतर तो मुंबईत आला. इथे आल्यावर ज्याठिकाणी कागदपत्रे लागत नाही, अशा ठिकाणी तो काम करू लागला. अमित पांडे या कंत्राटदाराने त्याला वरळी आणि ठाणे येथील पब आणि हॉटेलमध्ये काम मिळवून दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चौकशीदरम्यान आरोपीने आधी दावा केला की तो कोलकाताचा रहिवासी आहे, असं पोलिसांनी सांगितलं. पण त्याच्या फोनवरून पोलिसांना बांगलादेशमधील नंबर्सवर केलेले अनेक कॉल आढळले. बांगलादेशातील आपल्या कुटुंबियांना कॉल करण्यासाठी त्याने काही मोबाईल ॲप्सचाही वापर केला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला फोन करायला सांगितलं. त्याला बांगलादेशमधील त्याच्या भावाकडून ओळखीच्या पुराव्यासाठी कागदपत्र मागवायला सांगितलं. त्या कागदपत्रांवरून त्याच्या बांगलादेशी नागरिकत्वाची पुष्टी झाली.
इंडियन एक्सप्रेसने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या इमारतीत घुसण्याआधी आरोपीने इतर बॉलीवूड स्टार्सच्या बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. कुत्रे भुंकल्याने तो तिथून पळून जाताना काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपी सैफच्या घरी गेला तेव्हा त्याच्याकडे चाकू आणि काही हत्यार होती. तिथून घरातून पळून गेल्यानंतर आरोपी वांद्रे येथील एका बागेत झोपला आणि कपडेही बदलले, असे सूत्रांनी सांगितले. आरोपीला रविवारी पहाटे २ वाजता ठाण्यातून पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व त्याने फूड स्टॉलवर ऑनलाइन पेमेंट केल्याने तो पकडला गेला.