Saif Ali Khan attack case : सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली आहे. १६ जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून अभिनेत्यावर चाकू हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली आहे. पुढील चौकशीसाठी त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या हल्लेखोराला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी हा आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता आणि त्याने विजय दास, बिजॉय दास, बीजे आणि मोहम्मद इलियास अशी अनेक नावे वापरली होती अशी माहिती दिली आहे. आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.

आरोपी गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होता. अटकेच्या काही दिवस आधी तो एका कंत्राटदाराबरोबर बांधकाम स्थळावर काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर, आरोपी सतत बातम्यांचे चॅनेल पाहत होता असं पोलिसांनी सांगितलं, तसेच अटकेच्या भीतीने त्याने आपला फोनही बंद केला होता.

हा शोध कसा सुरू झाला?

गुरुवारी पहाटे २ ते २:३० च्या सुमारास सैफ अली खानच्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावर दरोडेखोर शिरला. यावेळी सैफने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या हल्लेखोराचा सामना केला. सैफवर चाकूने सहा वार करण्यात आले याशिवाय अभिनेत्याच्या घरातील मदतनीस सुद्धा यात जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, सैफची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.

शुक्रवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पहिल्या संशयिताला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला वांद्रे येथील पोलिसांनी चौकशीसाठी आणलं. तथापि, पाच तासांनंतर, त्याला सोडून देण्यात आलं कारण, पोलिसांना आढळले की त्या व्यक्तीचा सैफ प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. शनिवारी पुन्हा एकदा, छत्तीसगडमधील येथे सैफवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात एका ३१ वर्षीय व्यक्तीला ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “दुर्गमध्ये ताब्यात घेतलेला संशयित आरोपी असल्याचं दिसत नाही, परंतु आम्ही पडताळणीसाठी एक पथक (छत्तीसगडला) पाठवलं आहे. मुंबई पोलिस गुन्हेगाराच्या शोधात प्रयत्न करत आहेत.” अखेर मध्यरात्री ठाणे येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बनावट भारतीय ओळखपत्र असलेला हा हल्लेखोर भारतीय आहे की बांगलादेशी नागरिक आहे याचाही पोलीस तपास करत आहेत. अटकेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोलिस सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

Story img Loader