Saif Ali Khan Stabbing Case Updates: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या घरात हल्ला झाला. घरात शिरलेल्या दरोडेखोराने चाकूने वार केले, यात सैफ गंभीर जखमी झाला. या घटनेला दोन दिवस उलटले असून पोलीस त्या हल्लेखोराचा शोध घेत होते, आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज (शनिवारी) मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतलं. सध्या अधिकारी त्याची चौकशी करत आहेत, असे वृत्त इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते, त्यानंतरचे त्याचे वांद्रे व दादरमधील फोटो समोर आले होते. आता या प्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
हल्लेखोराने सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर कपडे बदलले होते. दोन ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. अभिनेत्यावर हल्ला होऊन ५० तासांहून अधिक काळ लोटला, तरीही हल्लेखोराचा शोध सुरूच आहे. घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज आदल्या दिवशी समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसला होता. आता एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये होता. घरातील मदतनीसने त्याला पाहिलं. त्याच्या हातात काठी व चाकू होते. तो जेहच्या पलंगाकडे धावत गेला, पण मदतनीसने त्याला अडवलं. हा गोंधळ ऐकून सैफ व करीना तिथे पोहोचले. तिथे सैफची त्याच्याबरोबर झटापट झाली. त्याचदरम्यान त्याने चाकूने सैफवर वार केले. सैफला मानेला, हाताला, पाठिला गंभीर जखमा झाल्या. तसेच मानेमध्ये चाकूचे टोक घुसले होते. घरातील मदतनीस व तैमूरने सैफला रिक्षातून रुग्णालयात नेलं. नंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचे टोक काढले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल.