बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सैफच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. जीवघेण्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला २१ जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अशातच आता सैफवरील हल्ल्याबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी वांद्रे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एक हजार पानांहून अधिक मोठ्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. यात फॉरेन्सिक लॅब रिपोर्टचाही उल्लेख आहे. यात गुन्ह्याच्या ठिकाणी सैफच्या शरीरावरील आणि आरोपींकडून मिळालेले चाकूचे तुकडे हे एकाच चाकूचे होते. यावरून पोलिसांनी स्पष्ट केलं की, शरीफुल इस्लामनेच अभिनेत्यावर हल्ला केला आहे.
त्याशिवाय, तपासादरम्यान पोलिसांना आरोपी शरीफुल इस्लामच्या डाव्या हाताचे बोटांचे ठसेही आढळले. या बोटांच्या ठशांच्या अहवालाचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामुळे या प्रकरणात आरोपीचा सहभाग आणखी स्पष्ट होतो. या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लामला आधीच अटक केली होती. आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, या प्रकरणातील पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या आरोपपत्रात सैफ, करीना कपूर, त्यांचे घरातील कर्मचारी आणि इतरांसह ७० हून अधिक साक्षीदारांचे जबाब आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी नागरिक आहे आणि तो भारतात बेकायदा राहत आहे. जर आरोपी जामिनावर सुटला, तर तो बांगलादेशला पळून जाईल आणि त्यामुळे तपासात अडथळा येऊ शकतो. आरोपीची जामिनावर सुटका झाल्यामुळे तो पुन्हा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच शरीफुल त्याच्या पगारातून दरमहा काही पैसे बांगलादेशला पाठवीत असे. यावरून त्याचे नागरिकत्व सिद्ध होते, असेही म्हटलेय.
दरम्यान, हल्ल्यानंतर सैफ अली खान आता बरा झाला असून त्याने कामालाही सुरुवात केली आहे. शिवाय त्याची प्रकृतीही आता बरी आहे. नुकतीच अभिनेत्री व सैफची बहीण सोहा अली खानने त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली होती. “आम्हा सर्वांना सैफची काळजी वाटत होती. आमची कायम हीच इच्छा होती की, तो बरा व्हावा आणि आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. तसेच तो त्याच्या कामावरही परतला आहे. आम्हालाही हेच हवे होते. देवाचे आभार, आता तो पूर्णपणे बरा आहे.” असे सोहाने म्हटले.