Saif Ali Khan Attack Updates : अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी ( १६ जानेवारी ) रात्री वांद्रे येथील राहत्या घरात दरोडेखोराने चाकूने हल्ला केला. ही बातमी समोर येताच संपूर्ण बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली. मध्यरात्री सैफला त्याचा मुलगा इब्राहिम अली खान आणि केअरटेकरने लीलावती रुग्णालयात दाखल केलं. सैफला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचारांना सुरुवात केली. यानंतर अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. यादरम्यान, सैफचे चाहते व कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते.
गुरुवारी दुपारी, सैफच्या टीमकडून तसेच लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली. सैफवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील काही दिवस डॉक्टरांची टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवेल आणि याप्रकरणी पोलीस पुढचा तपास करतील असं अभिनेत्याच्या टीमने सांगितलं. सबा पतौडी व्यतिरिक्त या घटनेबाबत कोणीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नव्हती. आता नुकतीच करीना कपूर खानने या घटनेबाबत आपली पहिली प्रतिक्रिया इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.
करीना लिहिते, “हा आम्हा कुटुंबीयांसाठी प्रचंड आव्हानात्मक दिवस होता. गेल्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलंय…या सगळ्याचा विचार आम्ही अजूनही करत आहोत. आमचं कुटुंब या कठीण काळातून जात असताना, मी मीडिया आणि पापाराझींना आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की, त्यांनी सतत अनुमान काढणं आणि या घटनेचं कव्हरेज करणं टाळावं. या काळात तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी निश्चितच आभारी आहे. मात्र, सतत एखाद्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा सुरक्षेसाठी मोठा धोका होऊ शकतो. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. एक कुटुंब म्हणून या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या. या संवेदनशील काळात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते”
हेही वाचा : Saif Ali Khan: दरोडेखोराने १ कोटी रुपये मागितले, सैफ अली खानच्या घरातील मदतनीसची पोलीस जबाबात माहिती
दरम्यान, करीना कपूरने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेक बॉलीवूड कलाकारांनी अभिनेत्रीला पाठिंबा देत, “या कठीण काळात आम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर आहोत” असं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे. याशिवाय पूजा भट्ट, रवीना टंडन या अभिनेत्रींनी देखील सैफसाठी पोस्ट शेअर करत कलाकारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.