Saif Ali Khan १६ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर सैफला सर्जरीही करावी लागली होती. हल्ला झाल्यानंतर करीनाने तो सगळा प्रसंग पाहिला आणि ती त्याला काय म्हणाली होती? हे आता समोर आलं आहे. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी बांगलादेशी नागरिक आणि हल्लेखोर मोहम्मद शीरफुल फकीरच्या विरोधात १६१३ पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये काय काय घडलं त्याचे तपशील आहेत.

१६ जानेवारीला काय घडलं?

सैफ अली खानच्या घरामध्ये चाकू घेऊन एक हल्लेखोर घुसला होता. त्याला सैफच्या घरी चोरी करायची होती. मात्र तो पकडला गेला त्यानंतर सैफ आणि हा हल्लेखोर यांच्यात झटापट झाली होती. ही घटना घडली तेव्हा सैफची पत्नी करीना आणि या दाम्पत्याची दोन मुलं तैमूर आणि जेह हे सगळे घरात होते. सैफवर चाकू हल्ला केल्यानंतर या हल्लेखोराने म्हणजेच मोहम्मद शरीफुल फकीरने तिथून पळ काढला होता. तो तीन दिवस लपत होता पण पोलिसांनी त्याला अटक केली. आता चार्जशीटमध्ये काय नमूद केलं आहे ते जाणून घेऊ.

पोलिसांकडून १६१३ पानी आरोपपत्र

सैफ हल्ला प्रकरणात पोलिसांनी १६१३ पानी आरोपपत्र तयार केलं आहे. करीना कपूरने सैफला काय सांगितलं त्याचा उल्लेख या चार्जशीटमध्ये आहे. जेव्हा सैफ आणि हल्लेखोर मोहम्मद यांची झटापट झाली तेव्हा ती म्हणाली की, “सैफ तू त्याला (मोहम्मद) सोड आणि तुला जे लागलं आहे जखमा झाल्या आहेत त्याकडे लक्ष दे. खाली चल आपण तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊ.” चार्जशीटमध्ये हा उल्लेख आहे. आपल्या पतीला म्हणजेच सैफला रक्तबंबाळ झालेलं पाहून करीनाला काय करावं ते नीट सुचलं नाही त्यामुळे ती त्याला म्हणाली तू हे सगळं सोडून दे आणि आधी खाली चल आपण रुग्णालय गाठू. करीनाने सगळे सुरक्षित आहेत ना? याची खात्री केली आणि त्यानंतर ती सैफला लिफ्टने खाली घेऊन गेली. हल्लेखोराने तोपर्यंत पळ काढला होता. पण हे तेव्हा करीनाला लक्षात आलं नाही.

Saif Ali Khan private security increased after attack Mumbai news
हल्ल्यानंतर सैफ व करीना दोघांनाही सुरक्षा; खासगी सुरक्षेतही वाढ ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

सैफने हल्लेखोर मोहम्मदला पकडण्याचा प्रयत्न केला होता-करीना कपूर

पोलिसांनी दिलेल्या चार्जशीटनुसार करीनाने हे सांगितलं आहे की सैफने हल्लेखोराचा मुकाबला तर केलाच. शिवाय तू कोण आहेस? तुला काय पाहिजे हे विचारलं तो लुटीच्या उद्देशाने आला आहे हे समजल्यावर त्याने हल्लेखोराला पकडण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी हल्लेखोराने सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर वार केले. चार्जशीटमध्ये असाही उल्लेख आहे की करीना तेव्हा जहांगीर, तैमूर आणि एलिम्मा (केअरटेअकर) यांना घेऊन बाराव्या मजल्यावर असलेल्या खोलीत पळाली. त्यानंतर सैफही त्या खोलीत आला तेव्हा तो रक्ताने माखला होता. त्याच्या पाठीतून, मानेतून रक्त येत होतं.

सैफने काय सांगितलं याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये

तसंच सैफने काय सांगितलं त्याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. सैफने सांगितलं की सर्जरी दरम्यान माझ्या पाठीतून चाकूचा एक भाग डॉक्टरांनी काढला. मला ही माहिती डॉक्टरांनी दिली. या चार्जशीटमध्ये ४० हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी आहेत. १९ जानेवारीला पोलिसांनी मोहम्मदला अटक केली. त्यानंतर त्याला आता शिक्षा झाली आहे. दरम्यान या प्रकरणी १६१३ पानी आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. यामध्ये हा सगळा उल्लेख आहे.