Raveena Tandon On Saif Ali Khan Attacked : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मुंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या घरी चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हादरली असून, सैफच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी तिने प्रार्थना केली आहे. तसेच, वांद्रेतील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेत रवीनाने या भागात सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

आज (१६ जानेवारी २०२४) रवीना टंडनने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून वांद्रेतील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांवर आपला संताप व्यक्त केला. तिने लिहिले, “पूर्वी राहण्यासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या रहिवासी भागात सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले आहेत.”

हेही वाचा…सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

रवीनाने पुढे लिहिले, “अपघात घोटाळे, फेरीवाल्यांचा माफिया, अतिक्रमण करणारे, जमीन बळकावणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बाईकवरून फोन किंवा सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार करत आहेत. याला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. सैफ लवकर बरा होवो, हीच प्रार्थना.”

रवीनावरही हल्ला

गेल्या वर्षी, रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवर मुंबईत जून महिन्यात हल्ला करण्यात आला होता. ड्रायव्हरच्या बेफिकीर वाहन चालवण्याच्या आरोपांमुळे हा प्रकार घडला होता. नंतर, रवीनाने NewsX Live ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मुंबई पोलिसांच्या मते हा हल्ला पूर्वनियोजित होता.

हेही वाचा…Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला

सैफ अली खानवरील हल्ला

सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या टीमने ही घटना चोरीच्या उद्देशाने घडल्याचे सांगितले. हा हल्ला पहाटे २:३० वाजता झाला, तेव्हा सैफ आपल्या कुटुंबीयांबरोबर झोपला होता. हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकू खुपसला, यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, या रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला हाताला व मणक्याला जखमा झाल्या आहेत.

Story img Loader