Saif Ali Khan Attacked बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री भीषण हल्ला झाला. त्याच्या घरात शिरलेल्या हल्लेखोराने सहा वार केले. विजय दास, बिजॉय दास या नावाने तो मुंबईत वास्तव्य करत होता. सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा मूळ बांगलादेशी आहे. मोहम्मद इलियास असं त्याचं नाव अशी माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली. दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद हा हाऊस किपिंग एजन्सीमध्ये काम करत होता आणि सैफ अली खानच्या घरी तो येऊन गेला होता अशीही माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीसीपी दीक्षित गेडाम यांनी काय सांगितलं?

आरोपी बांगलादेशमधून आला आहे. त्यामुळे आवश्यक ती सगळी कलमं आम्ही लावली आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो आहोत. आरोपीला अटक झाल्यानंतर चौकशीसाठी कमी वेळ मिळाला आहे. इतर गोष्टी चौकशीत पुढे येतील. आरोपी बांगलादेशी असल्याचा प्राथमिक पुरावा मिळाला आहे. त्याच्याकडे कुठलंही भारतीय प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र नाही. भारतात आल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं. भारतात विजय दास या नावाने तो राहात होता. आरोपी साधारण सहा महिन्यांपूर्वी भारतात आला. मुंबईत काही महिने तो राहिला. त्यानंतर उपनगरांमध्ये राहिला आणि १५ दिवसांपूर्वी परत मुंबईत आला होता. हाऊस किपिंग एजन्सीमध्ये तो काम करत होता अशीही माहिती मिळाली आहे.

हे पण वाचा- ठाणे : कांदळवनाच्या जंगलात असा सापडला सैफ अली खानचा हल्लेखोर

सैफच्या घरी हल्ल्याच्या आधी येऊन गेला होता हल्लेखोर?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर ज्या हल्लेखोराने हल्ला केला तो हल्लेखोर हाऊस किपिंग एजन्सीकडून सैफच्या घरी सफाई कर्मचारी म्हणून गेला होता. सैफच्या घरी काम करणाऱ्या लोकांनी आणि सैफच्या कुटुंबाने ज्या एजन्सीला सफाईचं काम दिलं होतं त्यांच्यातर्फे काही लोक सफाई कर्मचारी म्हणून पाठवण्यात आले होते त्यात हा हल्लेखोरही होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

१६ जानेवारीला काय घडलं?

१६ जानेवारीला हा हल्लेखोर सैफच्या घराजवळ आला त्याने पाहिलं की सुरक्षा रक्षकाला डुलकी लागली आहे. त्यानंतर तो ११ व्या मजल्यावर नजर चुकवून गेला. एसीचा डक्ट काढून त्याने अभिनेता सैफच्या घरात प्रवेश केला. तो ज्या ठिकाणाहून आला तिथून जवळच जेहची खोली होती. त्याला सैफच्या घरातील गृहसेविकेने पाहिलं आणि आरडाओरडा केला त्यानंतर पुढला सगळा घटनाक्रम घडला अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

करीना कपूरने पोलिसांना काय सांगितलं?

गुरुवारी रात्री करीनाने पोलिसांना जबाब दिला. या जबाबात तिने म्हटलं की, ” हल्ला करताना हल्लेखोर खूप आक्रमक झाला होता. त्याने सैफवर अनेकवेळा वार केले. त्यामुळे आम्ही लगेच १२ व्या मजल्यावर गेलो. आरोपीपासून काही अंतरावरच दागिनेही होते, पण त्यातील सर्व दागिने तेथेच आहेत.” या घटनेमुळे करीना कपूर इतकी घाबरली आहे की तिची बहीण करिश्मा कपूरने तिला तिच्या खार येथील घरी नेलं. त्यामुळे करिश्माच्या खार येथील निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attacked attacker previously visited actor home for cleaning sources scj