Saif Ali Khan Attacked : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. सैफ सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफला शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी रूममध्ये हलवण्यात आलं आहे. लिलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यानंतर या घटनेबाबत आणि आरोपीबाबत माहिती दिली.
नेमकी काय घटना घडली?
मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास एक अज्ञात आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला. घरातील मदतनीसने त्याला अडवलं, त्यानंतर त्याने तिच्याशी वाद घातला. आवाज ऐकून सैफ अली खान तिथे पोहोचला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला हाताला व मणक्याला सहा जखमा झाल्या, यापैकी दोन जखमा जास्त खोल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
पाच मदतनीसांची चौकशी सुरु
सैफ अली खानच्या घरात शिरलेला आरोपी हा घरातील मदतनीसाच्या ओळखीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. मदतनीसनेच त्याला घरात येऊ दिलं असावं, अशी शक्यता आहे. आता पोलिसांना मदतनीसवरही शंका असून ते याचा सखोल तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरातील पाच कर्मचाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त माहितीसाठी चौकशी केली जात असल्याची माहिती IANS ने दिली आहे. दरम्यान डीसीपी गेडाम यांनी आरोपीबाबत माहिती दिली आहे.
डीसीपी गेडाम यांनी माध्यमांना काय माहिती दिली?
सैफ अली खानच्या घरी बुधवारी रात्री यांच्यावर चाकू हल्ला झाला. आम्ही या प्रकरणाच्या तपासासाठी १० टीम नेमल्या आहेत. या प्रकरणात आरोपी शिडीवरुन उतरल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंतच्या तपासात हे कळतं आहे की हा सगळा प्रकार चोरीच्या उद्देशातून घडला. आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत त्याला पकडल्यानंतर आम्ही पुढील माहिती देऊ. असं पोलिसांनी म्हटलं आहे.
आम्ही १० पथकं तयार करुन आरोपीचा शोध घेत आहोत-गेडाम
एका आरोपीची ओळख पटली आहे. त्याला अटक करण्यासाठी आमची पथकं कार्यरत आहेत. डीसीपी गेडाम यांनी सैफ अली खानच्या घराच्या बाहेर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आग लागल्यानंतर इमारतीतून उतरण्यासाठी जे जिने तयार केलेले असतात त्या जिन्यांवर हा आरोपी दिसला. त्या आरोपीने या जिन्यांचा वापर करुन अभिनेता सैफ अली खानच्या घरी प्रवेश केला. त्या आरोपीचे तपशील आम्हाला मिळाले आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. आत्ताच्या तपासात असा अंदाज आहे की चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफ अली खानच्या घरात आला होता. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. त्यानंतर आम्ही पुढील माहिती देऊ.