Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital : अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. दरोडेखोर सैफ-करीनाच्या वांद्रे ( पश्चिम ) येथील राहत्या घरी शिरला होता. यावेळी अभिनेत्याच्या घरात काम करणाऱ्या नोकरवर्गाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आवाजाने सैफ बाहेर आला. कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी अभिनेत्याने या चोराचा सामना केला आणि यादरम्यान त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले.
सैफ अली खान जखमी झाल्यावर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान ( सैफ व अमृता सिंह यांचा मुलगा ) आणि त्याच्या घरातील नोकरवर्गाने अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केलं. गुरुवारी पहाटे, ३.३० वाजता इब्राहिम आणि सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात आणलं, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर
पहाटे २.३० वाजता सैफ अली खान जखमी झाला. यावेळी करीना-सैफ तसेच त्यांची दोन्ही मुलं तैमूर व जेह मुंबईतील वांद्रे पश्चिमेतील सतगुरु शरण इमारतीत होते. हल्ल्यानंतर इब्राहिमशी संपर्क साधून त्याला तातडीने बोलावण्यात आलं. वडिलांवर झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच इब्राहिमने लगेच सैफ-करीनाच्या घराच्या दिशेने धाव घेतली आणि वडिलांना घेऊन तो रुग्णालयात रवाना झाला. “इब्राहिम व सैफच्या घरचे कर्मचारी त्याला पहाटे ३.३० वाजता रुग्णालयात घेऊन आले” अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी दिली आहे.
दरम्यान, सैफ आणि करीनाच्या टीमने याबाबत अधिकृत निवेदन जारी करत अभिनेत्यावर उपचार सुरू असून, याप्रकरणी मीडिया व चाहत्यांनी संयम बाळगावा, घरातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. पोलीस पुढील तपास करत असून, तुम्ही सर्वांनी काळजी व्यक्त केल्याबद्दल आभार अशी माहिती दिली आहे.
हेही वाचा : सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
सैफच्या घरी काय घडलं?
सैफच्या घरी मध्यरात्री नेमकं काय घडलं याबद्दल, अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना खुलासा केला आहे. मध्यरात्री २.३० वाजता एक दरोडेखोर सैफच्या घरात शिरला, यावेळी त्यांच्या घरातील मदतनीस ( मोलकरीण ) या चोराला पाहून जोरात ओरडली. या दरोडेखोराच्या हातात चाकू होतात. ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला, आपल्या कुटुंबीयांचं संरक्षण करण्यासाठी सैफ पुढे येताच चोर आणि सैफ दोघंही आमनेसामने आले. यावेळी चोराकडे चाकू होता, त्याने अभिनेत्याने वार केले. पण, स्वत:चा बचाव करण्यासाठी सैफकडे जवळ कोणतंही शस्त्र नव्हतं आणि तो यात जखमी झाला. यानंतर अभिनेत्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. असा खुलासा सैफच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे.