Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. या घटनेनंतर पोलीस आरोपीचा तपास करत आहेत. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेबाबत रझा मुराद यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोर सैफची हत्या करण्यासाठी तर आला नव्हता ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले रझा मुराद?
सैफ अली खानवर झालेला हल्ला ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की ज्या इमारतीत सैफ राहतो तिथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असते. सुरक्षा व्यवस्थेची तीन ते चार कडी आहेत, सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. या सगळ्या गोष्टी असताना हल्लेखोर सैफच्या घरात कसा पोहचला? मी त्याला चोर म्हणू की हल्लेखोर हे ठरवणं कठीण आहे. असं रझा मुराद यांनी म्हटलं आहे.
चोर किंवा हल्लेखोराचा हेतू काय होता? ते कळलं पाहिजे-रझा मुराद
रझा मुराद म्हणाले, “हल्लेखोर त्या घरात का गेला होता? त्याचा हेतू काय होता? तो फक्त चोरी करायला गेला होता की प्राणघातक हल्ला करायचा हा देखील त्याचा उद्देश होता. आरोपी पकडला जाणार नाही तोपर्यंत हे सगळं स्पष्ट होणार नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत ते हल्लेखोराला पकडतील. मागच्या तीस वर्षांपासून अशा घटना घडत आहेत. चित्रपट निर्माते मुकेश दुग्गल यांची हत्या करण्यात आली. राजीव राय यांच्यावर हल्ला झाला, राकेश रोशनवर गोळीबार झाला. खंडणीसाठी हे प्रकार घडले आहेत. मात्र अनेकदा लोकांसमोर या गोष्टी आणत नाहीत. जिवाची भीती असते त्यामुळे खंडणी देतात. पोलिसांपर्यंत जात नाहीत. हे अनेक वर्षांपासून घडतं आहे. हे कधीपर्यंत चालणार हे सांगता येणं कठीण आहे.”
हे पण वाचा- Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खानच्या घरात घुसलेला आरोपी हा…”, डीसीपी गेडाम यांनी दिली महत्त्वाची माहिती
हत्येच्या उद्देशाने तर हल्लेखोर आला नव्हता ना?-रझा मुराद
“हल्लेखोराचा उद्देश फक्त चोरीचा असता तर त्याने हल्ला का केला असता? चोर हा उंदराप्रमाणे चोरी करुन पळ काढतो. पकडलं गेलं पाहिजे असं त्याला वाटत नाही. चोरी केली की थांबत नाही तो पळतो. मात्र सैफवर सहा वार करण्यात आले. सैफच्या मणक्यापर्यंत जखमा गेल्या आहेत. त्यामुळे त्या हल्लेखोराला कदाचित हत्या करायची असेल. जर हत्येच्या इराद्याने तो सैफच्या घरात घुसला असेल तर यामागे कोण आहे ते समजलं पाहिजे. मात्र ही समस्या फक्त सिनेमात काम करणाऱ्या लोकांची नाही. प्रत्येक भारतीयाची आहे.” असं रझा मुराद यांनी म्हटलं आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत रझा मुराद यांनी हे विधान केलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास एक अज्ञात आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला. घरातील मदतनीसने त्याला अडवलं, त्यानंतर त्याने तिच्याशी वाद घातला. आवाज ऐकून सैफ अली खान तिथे पोहोचला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला हाताला व मणक्याला सहा जखमा झाल्या, यापैकी दोन जखमा जास्त खोल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.