Shah Rukh Khan’s house recced: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरात घरफोडीसाठी शिरलेल्या आरोपीने सैफवर हल्ला करत त्याच्यावर सहा वार केले. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना आता एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ज्या आरोपीने सैफ अली खानवर हल्ला केला होता, त्याने काही दिवसांपूर्वी वांद्र्यातील शाहरुख खानच्या घराचीही रेकी केल्याचे आता पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या निवासस्थानी पोहोचले असून पुढील चौकशी सुरु आहे.
या आठवड्यात १४ जानेवारी रोजी सदर आरोपीने मन्नतच्या बाहेर पाहणी केली होती. सैफ अली खानच्या इमारतीमधील जिन्यात सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला होता. या आरोपीची साधर्म्य असलेला आरोपी १४ जानेवारी रोजी मन्नतमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. भिंतीवर चढण्याचाही प्रयत्न आरोपीने केला होता. मात्र पुढे जाळी असल्यामुळे त्याचा हा प्रयत्न फसला.
सैफवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न करणारा आरोपी एकच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मन्नतमधून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या हल्लेखोराप्रमाणेच देहयष्टी असलेला एक व्यक्ती मन्नत बाहेर दिसून आला.
अभिनेता शाहरुख खानने या घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नसली तरी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सैफ अली खानची प्रकृती स्थिर
सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज (शुक्रवारी) दिलेल्या माहितीनुसार, तो हल्ल्यात थोडक्यात बचावला. चाकू त्याच्या मणक्यापासून फक्त दोन मिलीमीटर दूर होता. सैफ आता बरा असून काळजी करण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी नमूद केले. तसेच सैफवर शस्त्रक्रिया करणारे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी तो खूप भाग्यवान असल्याने वेळीच रुग्णालयात पोहोचला, असे म्हटले आहे.