सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने हल्ला केला. आता त्याच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर तो दोन तास वांद्रे येथील त्याच इमारतीच्या बागेत लपून बसला होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
सैफवर हल्ला करणारा आरोपी आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर ऊर्फ विजय दास याला रविवारी अटक करण्यात आली. आरोपीने सुरुवातीला तो कोलकाता रहिवासी आहे, असे असल्याचे सांगून तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस तपासात तो बांगलादेशी घुसखोर असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या फोनवर त्याच्या बांगलादेशमधील भावाने शाळा सोडल्याचा दाखला पाठवला होता. हे प्रमाणपत्र आरोपीचे बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी महत्वाचा पुरावा ठरले आहे. आरोपीने भारतात राहण्यासाठी आपले नाव बदलून विजय दास ठेवले होते.
बागेत लपला होता आरोपी
“सैफवर हल्ला केल्यानंतर (१६ जानेवारी रोजी) आरोपी सतगुरु शरण (सैफ राहत असलेल्या इमारतीचे नाव) या इमारतीच्या बागेत लपला होता. पकडले जाण्याची भीती असल्याने तो तब्बल दोन तास या बागेत लपून बसला होता,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. चोरीच्या उद्देशानेच तो सैफच्या घरात शिरल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.
“पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपी फकीरने पोलिसांना सांगितलं की त्याचं नाव विजय दास आहे आणि तो कोलकाता येथील रहिवासी आहे. पण तो ते सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून कोणतेही कागदपत्र देऊ शकला नाही. त्याने चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव सांगितले आणि तो बांगलादेशी असल्याचं सांगितलं,” एका अधिकाऱ्याने सांगितलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलंय.
पोलिसांनी फकीरला बांगलादेशातील त्याच्या कुटुंबातील कोणालातरी फोन कर असं सांगितलं. “त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि त्याला त्याचा शाळा सोडण्याचा दाखला पाठवलायला सांगितला. त्याच्या भावाने त्याच्या फोनवर दाखला पाठवला. हा दाखला फकीर बांगलादेशी नागरिक असल्याचे सिद्ध करणारा भक्कम पुरावा आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आरोपीने सैफ अली खानवर चाकूने बरेच वार केले होते. यात तो गंभीर जखमी झाला. सैफच्या पाठीत चाकूचे तुटलेले टोक शिरले होते, ते डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढले. सैफ सध्या लिलावती रुग्णालयात असून त्याची प्रकृती सुधारत आहे. दुसरीकडे, आरोपीला रविवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी त्याच्याबरोबर क्राइम सीन रिक्रिएट केला आहे.