Saif Ali Khan Amrita Singh : सैफ अली खानने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ५४ वर्षीय सैफ अजूनही बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. सैफ त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सैफने दोन लग्नं केलीत. त्याच्या दोन्ही पत्नी इंडस्ट्रीतील असल्याने त्याचा पहिला घटस्फोट व दुसरं लग्न याबद्दल बरेचदा चर्चा होत असते.

खरं तर सैफचं वैयक्तिक आयुष्य खूप फिल्मी राहिली आहे. सैफने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं. ‘कॉफी विथ करण’च्या एका भागात सैफने आई व ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर हजेरी लावली होती. या मुलाखतीत सैफने लग्नाचा निर्णय का घेतला होता व आता त्याचं पहिली पत्नी अमृताशी नातं कसं आहे, याबाबत माहिती दिली होती.

सैफने इतक्या कमी वयात लग्न का केलं होतं?

गप्पा मारताना करणने सैफला विचारलं की इतक्या लहान वयात त्याने लग्न का केले होते. त्यावर सैफ म्हणाला की लग्न करणं हे काहिसं घरातून पळून जाण्यासारखं होतं. “मला त्यावेळी वाटलं होतं की ही एक प्रकारची सुरक्षितता होती. तेव्हा मला ते सगळं खूप छान वाटत होतं आणि मला वाटलं की लग्न करून मी स्वतःचं एक घर बनवू शकेन.”

सैफचं अमृताशी नातं कसं आहे?

शर्मिला म्हणाल्या की सैफ आणि अमृता सारख्या स्वभावाचे होते. सैफ व अमृताने लग्न केलं तेव्हा ते एकत्र खूप आनंदी वाटत होते, पण ते १३ वर्षांनी वेगळे झाले. “२०-२१ व्या वर्षी लग्न केलं तेव्हा मी खूप तरुण होतो. लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. ती माझ्याशी खूप छान वागायची. ती माझ्या दोन मुलांची आई आहे. माझे तिच्याशी चांगले संबंध आहेत आणि मी तिचा खूप आदर करतो,” असं सैफ त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि अमृताबद्दल म्हणाला.

why saif ali khan was married to amrita singh
सैफ अली खान व अमृता सिंह

सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये प्रेम विवाह केला होता. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन अपत्ये झाली आणि लग्नानंतर १३ वर्षांनी ते विभक्त झाले. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफचं त्याच्या दोन्ही मुलांशी खूप छान नातं आहे. सैफने २०१२ साली करीना कपूरशी लग्न केलं. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. इब्राहिम व सारा आईबरोबर राहतात, पण अनेकदा सण व उत्सव साजरे करण्यासाठी ते सैफच्या घरी जातात. मात्र अमृता कधीच त्यांच्याबरोबर नसते.