Saif Ali Khan & Kareena Kapoor Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास वांद्रे ( पश्चिम ) येथील राहत्या घरी दरोडेखोराने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यादरम्यान करीना कपूर खानची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली होती. अभिनेत्री ही घटना घडण्याआधी तिची बहीण करीश्मा कपूर, निर्माती रेहा कपूर आणि सोनम कपूर यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवत होती. करीश्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘गर्ल्स नाइट’ असं कॅप्शन दिलं होतं, त्यामुळे हल्ल्याची घटना घडली तेव्हा करीना घरी नव्हती असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पार्टीहून परतल्यावर या घटनेच्या वेळी करीना व तिची दोन्ही मुलं घरीच असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान करीना कपूर वांद्रे येथील घरी होती. करीनासह तैमूर आणि जेह हे दोघंही घरीच होते. आपल्या कुटुंबीयांचं संरक्षण करण्यासाठी सैफ या चोराला सामोरा गेला मात्र, यादरम्यान त्याच्याकडे बचाव करण्यासाठी कोणतंही शस्त्र नव्हतं. दरोडेखोराच्या हातात चाकू असल्याने त्याने अभिनेत्यावर वार केल्याची घटना घडली आहे.
सैफ आणि करीनाच्या टीमने याबाबत अधिकृत निवेदन जारी करत अभिनेत्यावर उपचार सुरू असून, याप्रकरणी मीडिया व चाहत्यांनी संयम बाळगावा, घरातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. पोलीस पुढील तपास करत असून, तुम्ही सर्वांनी काळजी व्यक्त केल्याबद्दल आभार अशी माहिती दिली आहे.
सैफच्या घरी काय घडलं?
सैफच्या घरी मध्यरात्री नेमकं काय घडलं याबद्दल, अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना खुलासा केला आहे. मध्यरात्री २.३० वाजता एक दरोडेखोर सैफच्या घरात शिरला, यावेळी त्यांच्या घरातील मदतनीस ( मोलकरीण ) या चोराला पाहून जोरात ओरडली. या दरोडेखोराच्या हातात चाकू होतात. ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला, आपल्या कुटुंबीयांचं संरक्षण करण्यासाठी सैफ पुढे येताच चोर आणि सैफ दोघंही आमनेसामने आले. यावेळी चोराकडे चाकू होता, त्याने अभिनेत्याने वार केले. पण, स्वत:चा बचाव करण्यासाठी सैफकडे जवळ कोणतंही शस्त्र नव्हतं आणि तो यात जखमी झाला. यानंतर अभिनेत्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. असा खुलासा सैफच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे.