बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान उत्कृष्ट अभिनयाबरोबरच त्याच्या लूकसाठीही नेहमीच चर्चेत असतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर सैफने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या कारकिर्दीत सैफने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकीच एक म्हणजेच ‘हम साथ साथ है’. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल ८० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट एका कौटुंबिक कथेवर आधारित होता. ज्यामध्ये कुटुंब आणि प्रेम, नात्यातील गुंतागुंत आणि त्यातून होणारे संघर्ष आपल्याला पडद्यावर पाहायला मिळाले होते.
‘हम साथ साथ है’ चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. या चित्रपटात मोहनीश बहल, सलमान खना, करिश्मा, तब्बू, सोनाली बेंद्रे सारखी मोठी स्टारकास्ट होती. यामध्ये सैफने आलोक नाथ यांचा सर्वात धाकटा मुलगा विनोदचे पात्र साकारले होते. या चित्रपटातील सैफच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळाले. पण तुम्हाला माहिती आहे का ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सैफ झोपेच्या गोळ्या घेत होत्या. सूरज बडजात्या यांनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
सूरज बडजात्या म्हणाले, “‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या वेळी सैफच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार सुरु होते. त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. चित्रपटातील ‘सुनो जी दुल्हन’ या गाण्याचे शूटिंग सुरू असताना सैफला अनेक रिटेक घ्यावे लागले होते. याबाबत जेव्हा मी सैफची पहिली पत्नी अमृताशी बोललो तेव्हा मला कळालं की सैफ रात्रभर जागा राहायचा आणि चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने कशी वठवता येईल याचा विचार करत बसायचा. जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मी अमृताला सैफला झोपेच्या गोळ्या देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अमृताने सैफच्याच नकळत त्याला झोपची गोळी दिली होती. यानंतर जेव्हा सैफ दुसऱ्या दिवशी सेटवर आला तेव्हा त्याने एकाच टेकमध्ये एकदम चांगला शॉट दिला. त्यावेळी सेटवर उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.”
सैफच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘देवरा पार्ट वन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो बहिरा ही भूमिका साकारणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये जान्हवी कपूरदेखील एक महत्त्वाचं पात्र साकारणार आहे.